A special campaign to reach the grassroots of the 'Chief Minister Majhi Ladki Bahin' scheme
कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया वालावलकर. सोबत अदिती सावंत, रेवती राणे, चांदणी कांबळी, मुक्ती परब, अक्षता कुडाळकर व उमा कुडाळकर आदी.  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विविध योजना जाहीर करून मोठी पर्वणी लागू केली आहे. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजना ही योजना महिलांसाठी खास आधारवड ठरणारी योजना आहे. या योजना कुडाळ तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक गावात येत्या 1 ते 10 जुलै या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोचवून, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा महिला मोर्चा काम करणार आहे, अशी माहिती भाजपा महिला मोर्चाच्या ओरोस मंडळ अध्यक्षा सुप्रिया वालावलकर यांनी दिली.

कुडाळ भाजप कार्यालयात महिला मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सौ. वालावलकर बोलत होत्या. महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अदिती सावंत, कुडाळ शहर अध्यक्षा सौ. मुक्ती परब, नगरसेविका चांदणी कांबळी, तालुका सरचिटणीस रेवती राणे, शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर, उमा कुडाळकर आदी उपस्थित होते. वालावलकर म्हणाल्या, महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या हितासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजनेतून प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिलेच्या खात्यात जमा होणार आहेत आणि अशा बर्‍याचशा योजना ज्या आहेत त्या प्रभावीपणे लागू करण्यात आल्या असून फायदेशीर ठरणार आहेत. महिला मोर्चाच्या वतीने ओरोस मंडळ व कुडाळ मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां तालुक्यात प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाऊन, या योजनांची जनजागृती करून, लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. या योजनेंतर्गत ज्यांचे अडीज लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिलांना दरमहा दीड हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत.

यासाठी आवश्यक उत्पन्नाचे दाखले मिळविण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन माजी खा. नीलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यांनी कुडाळ तहसीलदार यांच्याशी चर्चा करून हे दाखले जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले आहे, असे सौ. वालावलकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT