ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ल्यात वयाची शंभरी पार केलेले 265 मतदार असून या मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्याबरोबर सर्वच मतदारांची पडताळणी करण्याचा निर्णय झाल्यास प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन मतदार पडताळणीची मोहीम आगामी काळात राबविली जाणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने मतचोरीचा आरोप करीत आहेत. या आरोपानंतर आगामी काळात होवू घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदार यादी पडताळणी मोहीम अलिकडेच राबविली.
बिहारमधील मतदार पडताळणी प्रयोगानंतर आता देशभरात मतदार यादी पडताळणीची मोहीम राबविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मतदार पडताळणीचा निर्णय झाल्यास घरोघरी जाऊन मतदार पडताळणीची मोहीम राबवली जाणार आहे.
तत्पूर्वी निवडणूक आयोगाने वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांच्या पडताळणीचा निर्णय घेतला आहे. या मतदारांची पडताळणी केवळ दोन दिवसांतच 9 व 10 सप्टेंबर रोजी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचा अहवाल 11 सप्टेंबर रोजी अहवाल सादर करावयाचा होता. 100 वर्षे पार केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन ते मतदार हयात आहेत का? त्यांचे वय बरोबर आहे का? जन्म तारखेत काही चुका झाल्यात का? वय कमी असताना जास्त दाखवले आहे का? याची सर्व पडताळणी केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात वयाची शंभरी पार केलेले 265 मतदार असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 123, कणकवली मतदारसंघात 76, कुडाळ मतदारसंघात 66 असे 265 मतदार जिल्ह्यात आहेत. या सर्व मतदारांची मतदार केंद्र अधिकार्यांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात लोकसभेनंतर नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, या निवडणुकांसाठी वापरलेल्या मतदार याद्यांमध्ये एकूण 6 लाख 78 हजार 928 मतदार होते.
या सर्व मतदारांची पडताळणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी 2002 मध्ये मतदारांची पडताळणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बिहारमधील मतदार पडताळणीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रातही मतदार पडताळणी होणार आहे.
या पडताळणी निर्णयामुळे मतदार यादी अद्ययावत होणार असून तो मतदार खरोखरच हयात आहे का? मयत असल्यास मतदार यादीतून नाव कमी करणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नाव असल्यास एकच नाव ठेवून मतदार यादी पडताळणी करून अद्ययावत केली जाणार आहे. तसेच मतदारांचे फोटो बरोबर आहेत की नाहीत, याचीसुद्धा पडताळणी होणार आहे. मतदार यादीत नाव नसल्यास नाव समाविष्ट करण्याचेही काम केले जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली.