रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे बेकायदेशीरपणे 204 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ बाळगणार्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. ही कारवाई 8 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास करण्यात आली. रईस सईद खान असे संशयिताचे नाव आहे.
त्याच्याकडून गांजा सदृश्य अमली पदार्थाच्या 13 पिशव्या, एक डिजिटल काटा, दोन मोबाईल रोख 3 हजार 500 रुपये असा एकूण 49 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधिक्षक बी. बी. महामूनी आणि स्थानिक गुहे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे पोलिस व अंमलदार शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना कोकण नगर येथील कब्रस्तानाच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत संशयित हातात कॅरीबॅग घेऊन उभा असलेला दिसून आला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने व त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला थांबवले.
त्याची अंगझडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क),20 (ब) 2(अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलिस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील यांनी केली.