Yogesh Kadam  Pudhari
रत्नागिरी

Yogesh Kadam | सोशल मीडियावरून पक्ष चालत नाही; तरुण एकत्र येत असतील तर स्वागतार्ह : योगेश कदम

पक्ष चालवणे ही वेगळी आणि कठीण प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Yogesh Kadam on Social Media Politics

खेड : सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे आणि विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे शक्य असले, तरी केवळ सोशल मीडियाच्या आधारावर राजकीय पक्ष चालवणे शक्य नसल्याचे मत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी (दि. २२) व्यक्त केले.

खेड येथील शिवसेना शहर शाखा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली.

“सोशल मीडियावरून कोणतीही पार्टी उभी करता येत नाही. त्या माध्यमातून लोकांना जोडता येते, संवाद साधता येतो; मात्र पक्ष चालवणे ही वेगळी आणि कठीण प्रक्रिया आहे,” असे स्पष्ट मत कदम यांनी मांडले. तसेच या उपक्रमामागचा नेमका उद्देश काय आहे आणि त्याला जनतेचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी राज्यातील तरुणांच्या भूमिकेवरही भाष्य केले. “भारत हा तरुणांचा देश आहे आणि महाराष्ट्रही तरुणांचे राज्य आहे. शासन निर्णय घेताना आम्ही तरुणांच्या मतांचा विचार करतो. त्यामुळे तरुण एकत्र येत असतील आणि सक्रिय सहभाग घेत असतील, तर ती स्वागतार्ह बाब आहे,” असे कदम म्हणाले.

राज्यातील राजकारणात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, डिजिटल माध्यमांतून उभ्या राहत असलेल्या मोहिमा आणि युवकांचा वाढता सहभाग यावर सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT