

रत्नागिरी : जून महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसापूर्वीच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन सुरू आहे. पावसाळ्यात उदभवणाऱ्या विविध साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. पावसाळ्यात २४ तास आरोग्य पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच पुरबाधित ३० गावांवर आरोग्य विभागाचा वॉच असणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य कावीळ विषमज्वर आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होवून हिवताप, डेंग्यासारखे आजार वाढतात. त्यामुळे या आजारांना आळत्त घालण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, सर्वेक्षणाच्या काळात नागरिकांना साथरोगाबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण कक्ष
आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण औषध कीट देण्यात आले आहे. या कीटमध्ये विविध प्रकारची औषधे आहेत. जिल्हा परिषद मुख्यालय, तालुकास्तरावर, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्याद्वारे गावांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी हे करावे
पावसाळ्या साथरोग होवू नयेत, यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे आणि माशा बसलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत, उघड्यावर शौचास बसू नये अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.