World Book Day 2025
रत्नागिरी : साहित्यिकांची आणि साहित्यप्रेमींची भूमी अशी ओळख असणार्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड हे गाव आता पुस्तकाचं गावं म्हणून ओळखले जाणार आहे. अख्खंच्या अख्खं गाव पुस्तकांनी सजले आहे. महाराष्ट्र शासन मराठी भाषा व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा ही नुकताच झाला आहे. यामुळे परिसरात वाचन संस्कृतीचा प्रसार होणार आहे.
या अतिशय उपयुक्त अशा उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार करणे, पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करणे, साहित्यिक वाचक आणि लेखक यांच्यातील संवाद वाढवणे, पर्यटन वाढवून गावाला आर्थिक उन्नती देणे, पर्यटकाला वाचनाची सोय उपलब्ध करून देणे, गावातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करून वाचनसंस्कृती वृंद्धीगत करणे हा आहे.
मुळात संपूर्ण भारतात ‘बुक व्हिलेज’ ही संकल्पना पहिल्यांदाच महाराष्ट्रात साकारली गेली. 2017 साली महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम सुरु केला. आणि यावर्षी मालगुंड या गावात हा उपक्रम कार्यन्वित होत आहे. या उपक्रमात मालगुंड गावातील अनेक घरे, विविध संस्था, हॉटेल, निवास व्यवस्थेची ठिकाणे, मंदिर परिसरात पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत मालगुंड गावात 30 व गणपतीपुळे गावात 05 ठिकाणी पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे साहित्य, काव्य, कथा, कादंबर्या, बालसाहित्य, चरित्रे, पर्यावरण, पर्यटन, इतिहास, धर्म, ग्रामीण जीवन, संदर्भ, कायदेविषयक, नियमावली, स्पर्धा परीक्षा, शासकीय या व अशा विविध विषयांवरची पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. दोन्ही गावातील 35 हून अधिक ठिकाणी साहित्य दालने तयार करण्यात येणार आहेत. या साहित्य दालनात कोणीही जाऊन मनपसंतपणे पुस्तक वाचू शकतो. काही ठिकाणी पुस्तकांची देवाण-घेवाण, चर्चा, साहित्यिक भेटीगाठी असे साहित्यिक उपक्रमही घेतले जाणार आहेत.
मालगुंड गावाची नवी ओळख जगभर होणार आहे. शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून विविध विषयांवरची हजारो पुस्तकं गावातील 35 दालनात पुरवली जाणार आहेत. नामवंत लेखक, प्रकाशक यांची पुस्तके हाताळण्याची संधी यानिमित्ताने गणपतीपुळे आणि मालगुंड गावात येणार्या पर्यटकांना मिळणार आहे.
मुळात माणसाच्या जीवनात वाचनाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. वाचनाच्या माध्यमातून माणूस आपलं ज्ञान वाढवतो, विचारांची दिशा बदलतो आणि स्वतःला समृद्ध करतो. महाराष्ट्र राज्याने या वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला.- गजानन उर्फ आबा पाटील अध्यक्ष - कवी केशवसुत स्मारक, मालगुंड