

रत्नागिरी : मच्छीमारांना पूर्वीपासून किसान पूरक दर्जा आहे. परंतु, प्रत्यक्षात कृषी क्षेत्राच्या दर्जाप्रमाणे मच्छीमारांना सवलती मिळत नव्हत्या. राज्यमंत्री मंडळाने आता मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने मच्छीमारांना प्रत्यक्षात पायाभूत सुविधा आणि सवलतींचा लाभ होण्याची आशा असल्याची प्रतिक्रिया श्री भगवती मच्छीमार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिलावर गोदड यांनी व्यक्तकेली.
मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांसह या व्यवसायाला पूरक असलेल्या उद्योगांना वीज वाणिज्य दराने पुरविली जाते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सहकारी संस्थासह बर्फ कारखाने, कोल्ड स्टोरेज, कोळंबी संवर्धन प्रकल्प आदींना कृषी क्षेत्राप्रमाणे वीज बिल आकारणी व्हावी, अशी अपेक्षा उपाध्यक्ष गोदड यांनी व्यक्तकेली आहे.
मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्वच उद्योगधंद्यांना सर्वसाधारणपणेे 12 ते 13 टक्क्याने कर्ज मिळते. परंतु, मत्स्य व्यवसाय क्षेत्र कृषी दर्जात आल्यानंतर कृषी दराप्रमाणे कर्ज मिळावे, अशी अपेक्षाही उपाध्यक्ष गोदड यांनी व्यक्त केली. शेतीतील काही क्षेत्रामध्ये कर माफी असते, त्याप्रमाणे मत्स्य व्यवसायालाही लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मत्स्य व्यवसायाला कोणत्या पायाभूत सुविधा आणि सवलतींचा लाभ मिळावा हे शासनाच्या या निर्णयाची खुलासेवार माहिती मिळू शकणार आहे.