खेड : कोकणातील वारकरी परंपरेला नवी दिशा देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत "श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान"तर्फे आध्यात्मिक व वारकरी गुरुकुलाचा प्रारंभ करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्याला संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम पार पडला.
या गुरुकुलाच्या माध्यमातून गरजू, अनाथ, निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह मोफत अध्यात्मिक व वारकरी शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, संत चरित्र, रामकथा, भगवतगीता, शिवचरित्र यांचा समावेश असेल, तसेच हार्मोनियम, तबला, पखवाज वादन, शास्त्रीय गायन यासारख्या कलांचा प्रशिक्षणही दिला जाईल.
कार्यक्रमात ह.भ.प. माणिक मोरे, उद्योजक कैलास नंदा, आणि संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भगवान कोकरे यांची उपस्थिती होती. कोकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संस्थेचे उद्दिष्ट विशद केले. "गुरुकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अध्यात्मिक मार्गदर्शन करून त्यांना समाजासाठी आदर्श व्यक्ती म्हणून घडवायचं आहे," असे ते म्हणाले.
लोटे येथील या गुरुकुलात यापूर्वीच गोशाळा कार्यरत होती. त्याच परिसरात आता हा नवीन अध्यात्मिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संपर्कप्रमुख ह.भ.प. जालिंदर काळोखे पाटील, विजय जगताप, रूपेश राजेशिर्के, भागवत भारती यांच्यासह अनेक नामवंत वारकरी आणि कीर्तनकार, गायक, पखवाजवादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे कोकणात वारकरी संप्रदायाला नवसंजीवनी मिळणार असून, तरुण पिढीला अध्यात्म आणि वारकरी परंपरेचे संस्कार सहज उपलब्ध होणार आहेत. समाजाला एक सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम कोकणातील वारकरी चळवळीचा नवा अध्याय ठरणार आहे.