

कोल्हापूर : राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक व आध्यात्मिक संस्कार देऊन नवीन पिढी घडविणारे वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान सर्वश्रेष्ठ आहे. अध्यात्माचे संस्कार देणार्या गुरुकुलसारख्या संस्थांना उभे करण्यासाठी सहकार्य करू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेे.
शिये (ता. करवीर) येथे गुरुवर्य आप्पासाहेब वासकर महाराज बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित गुरुवर्य विवेकानंद वासकर महाराज आध्यात्मिक व शैक्षणिक गुरुकुल आयोजित वारकरी संंमेलन व बालसंस्कार शिबिर सांगता कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काडेसिद्धेश्वर स्वामी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने, आ. चंद्रदीप नरके उपस्थित होते. जनता माझे टॉनिक, एनर्जी आहे. लोकाभिमुख कामांच्या जोरावरच मुख्यमंत्री असताना राज्याला पुढे नेण्याचे काम केल्याचे शिंदे म्हणालेे.
वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. पंढरपूरला अनुदान देताना हात आखडता घेतला नाही. संस्कारांच्या शिदोरीवरच आयुष्याची पुढील दिशा ठरेल. गुरुकुल संस्थेचे काम थांबणार नाही. ते पूर्णत्वास जाईल. नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाईल, असेही शिंदे म्हणाले.
मुलांवर चांगले संस्कार करणे पालकांचे कर्तव्य आहे. लहान मुलांना शिस्त लावताना प्रेम देण्याबरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी, असे काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले.पंढरपूर प्रमाणेच प्रतिपंढरपूर असणार्या नंदवाळला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा आहे. या ठिकाणी भक्तनिवास, रिंगण याचा आराखडा मंजूर करावा, नंदवाळला विशेष निधी द्यावा, अशी मागणी आ. चंद्रदीप नरके यांनी केली.
देवव्रत (राणा महाराज) वासकर यांनी प्रास्ताविक केले. गुरुकुलच्या वास्तूसाठी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आ. राजेश क्षीरसागर, आ. अशोकराव माने यांच्यासह कौस्तुभ महाराज वासकर, चैतन्य महाराज देहूकर, मंगलगिरी महाराज, भगवान महाराज हांडे, विठ्ठल महाराज चवरे आदी उपस्थित होते.