समीर खेडेकर (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Ratnagiri MIDC Blast | लोटे एमआयडीसीतील विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट; समीर खेडेकर यांचा जागीच मृत्यू

Boiler Air Pre-Heater Blast | बॉयलरचा एअर प्री-हिटर फुटून अपघात; औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह?

पुढारी वृत्तसेवा

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत दि.२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (वय अंदाजे ३५) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. बॉयलरच्या एअर प्री-हिटरमध्ये वाढलेल्या दाबामुळे अचानक झालेल्या स्फोटात ही दुर्घटना घडली.

घटनेच्या वेळी समीर खेडेकर हे संबंधित यंत्राजवळ एकटेच कार्यरत होते. स्फोट इतका जोरदार होता की त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तत्काळ सहकाऱ्यांनी त्यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी कामथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

या अपघाताबाबत कंपनीचे एचआर मॅनेजर सचिन खरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या घटनेची सखोल चौकशी कंपनीमार्फत तातडीने सुरू करण्यात आली आहे.” दरम्यान, खेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, औद्योगिक सुरक्षा आणि कामगार सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी सुरू आहे.

विशेष म्हणजे, याच वेळी लोटे औद्योगिक उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत औद्योगिक अपघात, प्रदूषण आणि स्थानिक रोजगार या विषयावर बैठक सुरू होती. त्याच बैठकीदरम्यान ही दुर्घटना घडल्याने उपस्थितांमध्ये आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मृत समीर खेडेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश कांबळे यांचे जावई होते. त्यांच्या अकाली निधनामुळे खेडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिकांनी औद्योगिक सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व चौकशी तातडीने करण्याची मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT