वैभव पवार
गणपतीपुळे : बलाढ्य दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघावर वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय मिळवत विश्वविजेतेपद प्रथमच प्राप्त केले आहे. याच विश्वविजेता महिला क्रिकेट संघाला गोलंदाजीचे धडे देणारे प्रशिक्षक अविष्कार साळवी हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र असल्याने संपूर्ण मालगुंडवासीयांची मान त्यांच्या प्रशिक्षणातील कामगिरीबद्दल उंचावली आहे.
अविष्कार साळवी हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. ते मालगुंड गावचे सुपुत्र आहेत. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्यांचा लाखमोलाचा वाटा ठरला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साळवी यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने सर्वच क्षेत्रात आपली कामगिरी चमकदार व लक्षणीय करून तब्बल 52 वर्षानंतर विश्वविजेतेपदाचा मान पटकावला आहे. या संघाला संघाला गोलंदाजीमध्ये विशेष प्रशिक्षण देऊन मूळचे मालगुंडचे रहिवासी असलेल्या अविष्कार साळवींनी सर्वोत्तम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली पात्रता सिद्ध केली आहे.
वर्ल्ड कपच्या भारतीय संघाच्या यशानंतर विजयाचे स्टेटस प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मोबाईलवर झळकत आहेत. अगदी त्याचप्रकारे भारतीय महिला क्रिकेट संघाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या अविष्कार साळवींचे स्टेटस देखील संपूर्ण मालगुंडवासियांच्या मोबाईलवर झळकत आहेत. विशेष म्हणजे अविष्कार साळवी यांनी खेळाडू म्हणून आणि विशेषत: एक गोलंदाज म्हणून भारतीय संघात तत्कालीन भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कप्तान सौरभ गांगुलींच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातून वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा मान पटकावला होता. त्या नंतरच्या काळात मात्र साळवी यांनी आपली खेळाडू म्हणून कारकीर्द थांबवून भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली कामगिरी बजावली आहे. त्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील गोलंदाजांना गोलंदाजीचे परिपूर्ण धडे देऊन त्यांनी वर्ल्डकपमध्ये सरस कामगिरी करण्यात भाग पाडले आहे.
या कामगिरीमुळेच त्यांची भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये एक उत्तम गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आता ख्याती निर्माण झाली असून, संपूर्ण मालगुंडवासियांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठीही ही भूषणावह कामगिरी ठरली आहे. या कामागिरीसाठी अविष्कार साळवी यांचे संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषतः मालगुंडमध्ये खास अभिनंदन होत आहे.