खेड : कोकणातील मनसेतून हकालपट्टी झालेले नेते वैभव खेडेकर यांच्या २३ सप्टेंबर रोजी भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र हा प्रवेश त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न असला तरी, तो भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांच्या सावटाखाली होत असल्याने विशेष ठळक ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षांत खेडेकर यांची राजकारणात सतत पिछेहाट झाली आहे. खेड नगरपालिकेतील एकहाती सत्ता गेल्यानंतर गत निवडणुकीत त्यांनी मनसेचे नाव-चिन्ह सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले मात्र, अपेक्षित त्यांच्या समर्थकांना यश मिळाले नाही. याच काळात त्यांच्या अनेक विश्वासू कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट तसेच इतर पक्षांकडे वाटचाल केली.
त्याशिवाय, नगराध्यक्षपद संपल्यानंतर खेडेकर यांच्यावर २० पेक्षा जास्त प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी हे आरोप उघडपणे मांडले होते. काही प्रकरणांत गुन्हे दाखल झाले असून न्यायालयाने त्यांना पालिकेची निवडणूक लढवण्यास मनाईही केली होती.
या साऱ्यामुळे खेडेकर यांची राजकीय ताकद कोकणात ढासळली आहे. खेडेकर भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत त्यामुळे आता होणारा भाजप प्रवेश हा त्यांच्या वैयक्तिक राजकीय पुनरुज्जीवनाचा मार्ग मानला जात असला तरी, तो भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल यावर मतमतांतरे आहेत. भाजपचे मंत्री ना.नितेश राणे यांनी खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख जाहीर केली होती मात्र त्यानंतर अचानक खेडेकर यांचा प्रवेश रद्द झाला. विशेष म्हणजे, अधिकृत तारीख भाजपकडून अद्याप जाहीर न झाल्याने प्रवेश खरोखरच २३ सप्टेंबरलाच होणार का, याबाबत संभ्रम कायम आहे.
कोकणातील या प्रवेश सोहळ्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर बळ मिळेल का, की भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाला उलटं नुकसान होईल, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.