रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात-नाचणी पिकाचे 3 हजार 950.20 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. नुकसानीपोटी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांना 3 कोटी 66 लाख 82 हजार रुपयास मंजुरी मिळाली आहे. लवकरच 20 हजार 811 शेतकर्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाने अक्षरशा जिल्ह्याला झोडपून काढले.त्यामुळे भात-नाचणीचे पिके बहरली होती. यंदा भात पिकांचे उत्पादन वाढणार असल्याची शक्यता होती. ऐन भात कापणीच्या हंगामातच सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे कापलेल्या भाताला अंकुर येणे, उभ्या पिकाला अंकुर येणे यासारखे प्रकार घडले. काही ठिकाणी शेतकर्यांची भाताची कापणी करूनही त्याचा उपयोग न होता, भात कुजून गेले.
कोकण विभागासाठी ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीसाठी निधी मंजूर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 3 कोटी 66 लाख 82 हजार रूपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 20 हजार 811 शेतकर्यांचे 3 हजार 950.20 हेक्टर क्षेत्रावरी पिकांचे नुकसान झाले आहे. लवकरच या शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम होईल.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
ऑक्टोबरच्या अवकाळी, अतिवृष्टीमुळे भात पिकात पाणीच पाणी साचले होते. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रशासन, कृषी अधिकार्यांनी सर्व ठिकाणी पीक नुकसानाची पाहणी दौरा केला. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आश्वासन दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी 3 कोटी 66 लाख 82 हजार रूपये राज्य सरकारने मंजूर केले आहे. लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.