

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील 952 रेशनदुकानदारांचे पाच महिन्यांचे कमिशन थकीत होते. त्यामुळे दुकानदारांची आर्थिक कोंडी झाली होती. अखेर जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका वगळता उर्वरित तालुक्यातील रेशनदुकानदारांचे ऑक्टोबरपर्यंतचे कमिशन जमा झाले असून नोव्हेंबर महिन्याचे कमिशन बाकी आहे. लवकरात लवकर तेही कमिशन देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना दिली.
रेशन दुकानदारांना 100 किलो धान्य विक्रीवर 150 रुपये कमिशन मिळत होते.दरम्यान, 20 ऑगस्टपासून हा दर वाढवून 170 रुपये प्रतिक्क्िंटल करण्यात आला आहे. सुरळीत कमिशन मिळत असताना जून महिन्यापासून रेशन दुकानदारांना कमिशन मिळाले नसून रखडले होते. त्यामुळे दुकानदार आर्थिक संकटात सापडले होते. जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानदार कमिशनच्या प्रतिक्षेत होते.
रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा विभाग, पुरवठा मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आली होती. अखेर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे थकीत कमिशन मिळण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरपर्यंतचे कमिशन दुकानदारांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित 1 महिन्याचे कमिशन लवकरात लवकर देण्यात येणार असल्याचे रजपूत यांनी सांगितले.