Shiv Sena Political Crisis in Konkan
रत्नागिरी : शिवसेना़ स्थापनेपासून रत्नागिरी जिल्हा हा सेनेच्या पाठी भक्कम उभा राहिला आहे. जिल्ह्यात सेनेने 1990 पासून झंझावाताला सुरुवात केली ती आजतागायत तशीच आहे. गेली अनेक वर्षे वादळे आली आणि ती शमलीसुद्धा, परंतु जे निष्ठावान सैनिक म्हणत होते, त्यांनीच सेनेला सोडचिठ्ठी दिली. त्याचबरोबर सध्याची राजकीय स्थिती बघता ठाकरे शिवसेनेचे भरकटलेलं जहाज किनार्याच्या शोधात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष म्हणून स्थापना केली. जिथे मराठी माणसावर अन्याय तिथे शिवसेना अशा पद्धतीने स्थापना झालेली सेना जिल्ह्यात 1966 ला आली. त्यावेळी अप्पा साळवी यांनी सहकार्यांना सोबत घेत शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. हळूहळू चंद्राच्या कलेनुसार ती वाढत निघाली. बाळासाहेबांनी लावलेलं रोपटं जिल्ह्यात बहरू लागलं. 1985 पासून रवींद्र माने, रामदास कदम, भास्कर जाधव, सुभाष बने, राजन साळवी, उदय बने, दत्ता कदम यांनी गावोगावी जाऊन शाखा स्थापन केल्या.
1990 ला शिवसेनेने पहिली विधानसभेत एंट्री केली. तब्बल 3 मतदार संघात सेनेचे आमदार निवडून आले. संगमेश्वरमधून रवींद्र माने, खेडमधून रामदास कदम, सूर्यकांत दळवी हे निवडून आले. यानंतर शिवसेनेने मागे वळून पाहिले नाही. जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवलं. यानंतर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवत 1995 साली झालेल्या पुन्हा निवडणकीत यश संपादन केले. यावेळी स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेले विश्वासू म्हणून ओळखणारे आप्पासाहेब साळवी हे राजापूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले.
त्यानंतर मात्तबर अशा काँग्रेसचे माजी राज्यमंत्री लक्ष्मण हातणकर यांचा पराभव केला. संगमेश्वरमधून रवींद्र माने दुसर्यांदा निवडून आले, तर चिपळूणमधून भास्कर जाधव यांनी एंट्री केली. खेड व दापोलीमधूनसुद्धा दुसर्यांदा रामदास कदम व सूर्यकांत दळवी निवडून आले. यामुळे जिल्हा भगवा झाला होता. 1999 च्या निवडणुकीतसुद्धा हाच सेनेचा करिष्मा कायम राहिला. यावेळी मात्र निष्ठावान असलेल्या आप्पा साळवी यांना उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे सेनेमध्ये वादळ निर्माण झाले. यावेळी गणपत कदम यांना सेनेकडून उमेदवारी मिळाली व ते निवडूनसुद्धा आले. रवींद्र माने, रामदास कदम, सूर्यकांत दळवी यांनी हॅट्ट्रीक साधली, तर भास्कर जाधव हे दुसर्यांदा निवडून आले.
विधानसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा शिवसेनेने मुसंडी मारली. 1997 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने एकतर्फी वर्चस्व मिळवले. विशेष म्हणजे 1997 पासून आजतागायत शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकत आहे. 2004 च्या निवडणुकीत मातब्बर असे रवींद्र माने यांना उमेदवारी नाकारली. यामुळे पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले. यावेळी नवखे सुभाष बने यांना उमेदवारी जारी झाली. ते निवडूनसुद्धा आले. त्याचबरोबर चिपळूणमध्येसुद्धा भास्कर जाधव यांना उमेदवार नाकारल्याने बंडखोरीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे अपक्ष असूनसुद्धा भास्कर जाधव यांना दोन नंबरची मत मिळाली होती. खेड व दापोली मध्ये रामदास कदम व सूर्यकांत दळवी हे चौथ्यांदा निवडून आले.
यानंतर मात्र शिवसेनेत 2005 ला मोठं वादळ आलं आणि या वादळात नारायण राणे यांच्यासोबत जिल्ह्यातील सुभाष बने आणि गणपत कदम यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, परंतु या वादळातूनसुद्धा शिवसेना सावरली. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेला आपला झंझावात कायम ठेवला. दापोली मधून सूर्यकांत दळवी पाचव्यांदा निवडून आले, तर चिपळूणमधून सदानंद चव्हाण निवडून आले, राजापूरमधून राजन साळवी निवडून आले. 2014च्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले. राजन साळवी, सदानंद चव्हाण हे निवडून आले. त्याचबरोबर या निवडणुकीत शिवसेनेत दाखल झालेले उदय सामंत रत्नागिरीतून निवडून आले.
त्यानंतर 2019च्या निवडणुकीत मात्र सेना पुन्हा नंबर वन ठरली. उदय सामंत, राजन साळवी, योगेश कदम हे निवडून आले. राष्ट्रवादीतून पुन्हा स्वगृही परत आलेले भास्कर जाधव असे चार आमदार सेनेतून निवडून आले, तर गतवर्षी पार पडलेल्या निवडणुकीत सेनेचा झंझावात थोडासा कमी झाला. कारण सेनेत पुन्हा एकनाथ शिंदे नावाचं मोठं वादळ आलं. यावेळी जिथे चार आमदार होते तिथे एकच आमदार निवडून आला.
सध्या सेनेची अवस्था ही तशी बिकटच बनली आहे. कारण सेनेत मात्तबर असणारे उदय सामंत, रामदास कदम, राजन साळवी यांनी सेनेला सोडचिट्ठी दिली. त्यामुळे सध्या बदललेली राजकीय परिस्थिती बघता सेनेचे भरकटलेले जहाज किनारा शोधत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरीत होऊन सेनेत 1989 रोजी दाखल झालो. सेनेने अनेक चढउतार पहिले, परंतु जिल्ह्यात आजही सेना भक्कम आहे. बाळासाहेबांचे विचार 80 समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे होते. बाळसाहेबांनी 1997 ला विमानतळावर भेटल्यानंतर मला आशीर्वाद दिला. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे मातब्बभर असे तत्कालीन जि.प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या विरोधात तू लढ असे सांगितले. तसेच 2005 साली राणे सोडून गेल्यानंतर मला मातोश्रीवर बोलावणे आले आणि मला बाळासाहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, उदय जा आणि जिल्ह्यात शिवसेना वाढव. त्यावेळी मला संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख केला गेला.