ना. उदय सामंत (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Ratnagiri News | जिंदल कंपनीची दादागिरी चालणार नाही

Uday Samant Statement | ना. उदय सामंत : गॅस टर्मिनल प्रकरणात कंपनीच्या अधिकार्‍यांना मंत्र्यांनी झापले

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : विविध प्रकल्प उभारून जिंदल कंपनी पैसा कमवते आणि दुसरीकडे स्थानिकांचे जीव जात आहेत. त्याचे कंपनीला काही सोयरसुतक नाही. पण आता कंपनीची दादागिरी सहन केली जाणार नाही. जोवर गॅस टर्मिलनबाबत स्थानिकांना कंपनी विश्वासात घेत नाही, तोवर काम सुरू करायचे नाही, असा सज्जड दम पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदल कंपनीच्या अधिकार्‍यांना भरला. गॅस टँकरची वाहतूक सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत पूर्ण बंद ठेवा आणि रात्रीची वाहतूक करा, असेही कंपनीला सुनावले. जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिलन, जयगड-तवसाळ पूल याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

जयगड येथे यापूर्वी झालेल्या वायू गळतीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. तेव्हा देखील कंपनी सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीसाठी पुढे आली नाही. राजकीय आणि माध्यमांनी दबाव टाकल्यानंतर कंपनी पुढे आली. कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड आहे. यातच कंपनीने जयगड येथे गॅस टर्मिनलचा घाट घातला आहे. याला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. परंतु कंपनी विरोध झुगारून टर्मिनलचे बांधकाम करत असल्याचे स्थानिकांनी उघड केले आहे. दरम्यान, सागरी मंडळाने टर्मिनलच्या कामाला स्थगिती देऊनही कंपनी अंतर्गत काम करत असल्याचे उघड झाले.

स्थानिकांनी हे काम बंद पाडले. याबाबत उदय सामंत म्हणाले, आम्ही पाहतोय परंतु कंपनीची दादागिरी वाढतच चालली आहे. कोणत्याही बैठकीला अधिकारी उपस्थित रहात नाही, ही मनमानी आणि दादागिरी आता सहन केली जाणार नाही. स्थानिकांचा गॅस टर्मिनलला विरोध आहे. त्यांना विश्वासात न घेता काम रेटत आहात. जोवर स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही. तोवर टर्मिनलचे काम होणार नाही. तुमच्या येणार्‍या प्रत्येक जहाजाची आता प्रशासन म्हणून आम्ही कसून तपासणी करून गॅस उतरायचा की नाही ते ठरवावे लागेल. गॅस टँकरच्या वाहतुकीमुळे स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे. गॅस टँकरची वाहतूक रात्री करा, अशी ताकीद ना. सामंत यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी जीवन देसाई, बंड्या साळवी, बाबू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

जयगड-तवसाळ पूल जोडरस्ता...

सागरी महामार्गातील सांडेलावगण ते तवसाळ असा पूल उभारला जाणार आहे. त्याच्या जोडरस्त्यासाठी लागणारी जागा देण्यास स्थानिक तयार आहेत. परंतु त्यांना अपेक्षित मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी होती. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्थानिकांना समाधानकारक मोबदला मिळेल, असे आश्वासन दिले. तसेच काही नागरिकांच्या सूचना होत्या त्यावरही विचार केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी, पूल बांधणार्‍या कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT