

रत्नागिरी ः शहरातील पेठकिल्ला-भाटकरवाडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी तीन दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरील बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
याबाबत निहाल मकसूद मुल्ला (वय 36) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी रात्री त्यांच्या घराच्या अंगणात पार्क केलेल्या तीन दुचाकींना अज्ञातांनी आग लावली. यामध्ये निहाल मुल्ला यांची अॅक्सेस, तहा इम्तियाज मिरकर यांची बुलेट आणि फजल इस्माईल मिरकर यांची अॅक्टिव्हा अशा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांच्या दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पान खख वर
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी पेठकिल्ला परिसरात संचलन (रुट मार्च) करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. याप्रकरणी पोलिसांनी सांबवाडी परिसरातील तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हा प्रकार वैयक्तिक वादातून घडला की यामागे जातीय तणाव निर्माण करण्याचे मोठे षडयंत्र आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळल्या आहेत. सर्व तपास करून आरोपींचा शोध घेतला जाईल. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.