देवरूख : देवरूख नगर पंचायतीमध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. केलेल्या विकासाचे मुद्दे घेऊन उमेदवारांनी मतदारांसमोर जावे. निवडून आल्यानंतर जनतेच्या मनातील विकासकामे करा, असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुती प्रचार मेळाव्यात उमेदवारांना दिला.
शहरातील श्री लक्ष्मी नृसिंह सभागृहात हा मेळावा झाला. यावेळी ना. सामंत यांनी जिल्ह्यामध्ये महायुती अभेद्य असल्याचे सांगितले. महायुतीने गत पाच वर्षांत सत्तेत राहून अनेक विकासकामे केली. हेच विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जा. जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास ठेवेल. जनता सोबत असल्यामुळे ही निवडणूक सोपी असल्याचेदेखील ना. सामंत यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर नगराध्यक्षांनी विकासात्मक असलेल्या संकल्पना आपल्यासमोर मांडा, विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असे ना.सामंत यांनी सांगून देवरुखच्या विकासाची जबाबदारी आपण घेतली असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीप्रसंगी ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी कोणती काळजी करू नका. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सुभाष बने यांनीही न.पं.मध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला. भाजपाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी देखील देवरूखच्या विकासाची माहिती देऊन आगामी केल्या जाणार्या कामांबाबत माहिती दिली.
या मेळाव्याला शिवसेनेचे नेते राजेंद्र महाडिक, विलास चाळके, तालुकाध्यक्ष प्रमोद पवार, जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, भाजपा तालुकाध्यक्ष रुपेश कदम, नगराध्यक्षाच्या उमेदवार मृणाल शेटये, माजी सभापती जया माने, राजू रेवणे, चंद्रकांत जाधव, दिलीप सावंत, अभिजीत शेट्ये आदींसह महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपा शहराध्यक्ष सुशांत मुळे यांनी केले.