मिरजोळे एमआडीसीत दोघांना १० जणांकडून जबर मारहाण करण्यात आली.  file photo
रत्नागिरी

मिरजोळे एमआडीसीत दोघांना १० जणांकडून जबर मारहाण

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरील एमआयडीसीतील मिरजोळे डी-मार्टसमोर दोघांना हातांनी, रॉडने तसचे दगडाने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी १० जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना गुरुवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास घडली.

गौरेश पाटील, हर्षा पाटील, शुभम पाटील, आदी पाटील, क्रिश पाटील, साई पाटील व अन्य चार जण (सर्व रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १० जणांची नावे आहेत. त्याच्याविरोधात भूषण बिपीन सावंत (२४, रा. मिऱ्या बंदर, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी भूषण सावंत हा त्याचा मावसभाऊ धर्मलिंग नाडर याचे झालेल्या भांडणाबाबत आपला मित्र सर्वेश कीरसोबत दुचाकीने ग्रामीण पोलिस ठाण्यात जात होता. त्यावेळी डी-मार्टसमोर दोन तरुणांनी दुचाकीवरून येत या दोघांना थांबवले.

भूषण सावंत त्याचा मित्र सर्वेश कीर सोबत थांबले असता, त्यांना थांबवणाऱ्या दोघांनी फिर्यादीचा मावस भाऊ धर्मलिंग नाडर याच्याशी झालेल्या भांडणावरून त्याला इकडे बोलावून घे, असे सांगितले. दरम्यान अन्य सात ते आठ संशयितही त्याठिकाणी दुचाकींवरून आले. त्यांनी फिर्यादी भूषण आणि त्याचा मित्र सर्वेशसोबत वादविवाद सुरू केला. संशयितांपैकी गौरेश पाटीलने भूषणच्या अंगावर धावत जाउन हाताची फाईट मारली, तर शुभम पाटीलने हातातील रॉडने भूषणच्या डोक्यावर, मानेवर मारला तसेच हर्षा पाटील, क्रिश पाटील आदी पाटील व इतर दोघांनी फिर्यादी आणि त्याचा मित्र सर्वेश कीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दुखापत केली. या झटापटीत भूषणच्या गळ्यातील चेन आणि ब्रेसलेट गहाळ झाले आहे.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT