खेड : शहरानजीक देवणे पुल येथे गुरूवारी (दि.३१) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुस्तकीम जहांगीर कादीरी (वय-२९ ) आणि अतीक रऊफ कादीरी (वय-३०, रा. नादगाव मोहल्ला ता. खेड जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नाव आहे. त्यांच्याकडून एकूण ३० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रकाश पवार यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे करत आहेत.