रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थी शाळेला जावून सुखरूप घरी जावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर अवंलबून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्र्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800221251 हा जाहीर केला होता. अवघ्या आठवड्यात जिल्ह्यासह राज्यभरातून 308 तक्रारींचा पाऊस झाला आहे. यापैकी बसेस वेळेवर न येणे, थांब्यावर न थांबणे, पासधारकांना प्रवेश नाकारणे ही याप्रमुख तक्रारी विद्यार्थी, विद्यार्थिंनीनी केल्या आहेत.
लाडक्या लालपरीतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, परिवहन मंत्र्यांच्या धाराशिवच्या दौर्यानंतर बसेस वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी असलेल्या परिवहन मंडळाने आता शालेय विद्यार्थ्यांच्या ज्या काही एसटी बसेस विषयी समस्या आहेत, शाळेत, घरी वेळेत जावे, बसेस वेळेवर यावे त्यासाठी हेल्पलाईन जाहीर केला होता. आठवडाभरात 308 तक्रारी जिल्ह्यासह राज्यभरातून आल्या आहेत.
एसटी प्रशासनाला मुलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी असल्यामुळे तक्रारी निवारण्यासाठी महामंडळाच्यावतीने काम सुरू असून कामकाजात, कर्मचारी मानसिकतेत त्वरीत सुधारणा कराव्यात असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक एसटी प्रशासनास दिले आहे. दिलेल्या तक्रारींचे 100 टक्के निराकरणावर लक्ष केंद्रीत केल्यास हा हेल्पलाईन क्रमांक केवळ तक्रार पेटी न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे विश्वास केंद्र बनेल असे मत विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी विभागातून शाळेतील विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर तक्रारी केल्या होत्या. मोजक्या तक्रारी आल्या होत्या. त्या तातडीने उपाययोजना करून तक्रारीचे निराकरण करण्यात आल्याचे रत्नागिरी एसटी विभागातर्फे सांगण्यात आले.
तर आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षक निलंबित होणार...
हेल्पलाईन सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी हेल्पलाईनवर तक्रारी केल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना परिवहन मंत्र्यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.