रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार  File Photo
रत्नागिरी

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

देवरुख येथून रत्नागिरीत परिचारिका प्रशिक्षणासाठी येणार्‍या युवतीवर लैगिंक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी येणाऱ्या 19 वर्षीय युवतीला बेशुध्द करुन शहरानजीकच्या जंगलमय भागात नेऊन एका रिक्षाचालकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदू जनजागृती संस्थांसह सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतल्याने वातावरण तंग झाले होते.

पिडीता रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थिनी नर्सिंगच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. ती मुळची देवरुख येथील असून ती सध्या साळवी स्टॉप परिसरात वास्तव्याला आहे. प्रशिक्षण संस्थेत रविवारी(दि.25) सुट्टी असल्याने ती देवरुखला घरी गेली होती. सोमवारी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहण्यासाठी सकाळी ती नेहमीप्रमाणे सहावाजण्याच्या बसने देवरुखहून रत्नागिरीत आली. या ठिकाणी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती साळवीस्टॉप येथे उतरली. स्टॉपवरील रिक्षा न करता तिने जे.के.माईल्स येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्‍या एका शेअर रिक्षाला हात केला. यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा वळवून उभी केली. त्यामुळे ही मुलगी रस्त्याच्या विरुध्द बाजुला रिक्षात बसण्यासाठी गेली. बसमधून उतरल्यामुळे थोडेसे अस्वस्थ वाटत होते. यावेळी रिक्षा चालकाने तिला पाणी पिण्यासाठी दिले. त्यानंतर आपण बेशुध्द झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

बेशुध्द अवस्थेतून जाग आली त्यावेळी ती चंपक मैदानातील जंगल परिसरात पडलेली होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. हातावर ओखडले असल्याच्या जखमा होत्या. तिच्याकडील वस्तू इतरत्र टाकून दिलेल्या होत्या. सर्व वस्तू गोळा करुन तिने आपल्या बहिणीला मोबाईलवरुन कॉल केला. वाहनांच्या आवाजावरुन ती रस्त्यावर आली. त्याठिकाणाहून येणार्‍या दुचाकीस्वाराची मदत घेवून तिने आपल्या बहिणीशी बोलणे केले. तोपर्यंत तिने आपल्या आईवडीलांना या घटनेची कल्पना दिली होती. यानंतर तिने तिच्या फ्लटवर नातेवाईकांना बोलावून घेतले.

यानंतर आई वडिलांनी आणि भावाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याचवेळी पोलीसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रुग्णालयात येवून तातडीने उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या. त्यावेळी ती मानसिक तणावाखाली होती. या प्रकाराने हादरलेल्या मुलीकडून प्रत्यक्ष घटना जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यानुसार पोलिसांची पथके तातडीने सीसीटीव्ही व अन्य पुरावे गोळा करण्यासाठी रवाना झाले. अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी तिला धीर देत, घटनाक्रम आणून घेतला. त्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन त्यांनी मुलीच्या जबाबाप्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT