Sea Undercurrent Pudhari
रत्नागिरी

Sindhudurga Sea Undercurrent: सात जणांचा जीव घेणारे समुद्रातील ‘अंडर करंट’ अन् ‘रिप करंट’ हे नेमकं काय असते?

धोक्याची सूचना देण्यात स्थानिक प्रशासकीय यंत्रणा अपयशी

पुढारी वृत्तसेवा

What is a rip current in the ocean Explained in Marathi

गणेश जेठे

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शिरोडा-वेळागरमधील अथांग समुद्राच्या ओढीने कित्तूर-मणियार कुटुंबातील 13-14 वर्षांचा मुलगा किनार्‍यावर उतरला आणि नेमका ‘रिप करंट’मध्ये सापडला. त्याला समुद्र पोटात घेतोय हे पाहून भानावर आलेल्या कुटुंबातील सहा-सात जणांनी एकमेकांचे हात घट्ट पकडून जीवसाखळी तयार केली. मात्र, वेगवान शक्तिशाली ‘रिप करंट’च्या पुढे जीवसाखळी निष्प्रभ ठरली आणि सात जण बुडाले. किनार्‍यावर जीवरक्षक नव्हता, प्रभावी सूचना नव्हते फलक नव्हते, तत्काळ धोक्याची माहिती देणारी माणसेही नव्हती. शासकीय यंत्रणेच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्यांचे प्राण गेले, असेही म्हणता येईल.

121 किलोमीटर लांबीच्या सिंधुदुर्गच्या समुद्रकिनार्‍यावर तब्बल 27 बीचेस आहेत. तेही स्वच्छ आणि सुंदर. वरवर समुद्राचे रूप डोळ्यांना दिसताना तसे एकसारखेच. समुद्री शास्त्रज्ञांचे अखंडपणे यावर संशोधन सुरू आहे. मात्र, यातून जे काही ज्ञान हाती लागले त्याची पोतडी तशी उघडलीच गेली नाही. परिणामस्वरुप ‘रिप करंट’ पासून ‘अंडर करंट’पर्यंत आणि समुद्रातील अंतर्गत हालचालींपासून थेट वादळाच्या परिणामांपर्यंत किनार्‍यांशी मैत्री करायला जाणार्‍या साहसी पर्यटकांना काहीच ठाऊक नाही. म्हणूनच या मैत्रीत दगाफटका होत आला आहे आणि जीव जात आले आहेत.

Sea Undercurrent Tragedy

सरकारी यंत्रणा बेपत्ता होती

ही दुर्घटना टळू शकली असती, परंतु पर्यटकांना सावध करणारी गेल्या दोन वर्षांपासून वेळागर किनार्‍यावर जीवरक्षक नसल्याचे लोक सांगतात. समुद्रात वादळाची स्थिती सरकारी यंत्रणेने जाहीरपणे सांगितली होती, परंतु त्याची माहिती सर्व लोकांपर्यंत कशी पोहोचणार? त्यासाठी किनार्‍यावर पर्यटकांना सावध करणारी यंत्रणा, माणसे आणि वाचवणारे जीवरक्षक उपलब्ध ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

जेव्हा पायाखालची वाळू सरकते

भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रातील लाटा बाहेर येतात तेव्हा समुद्राच्या पोटातील वाळू बाहेर आणतात. त्याचक्षणी एखादी व्यक्ती किनार्‍यावर पाण्यात उभी असेल तर त्याच्या पायाभोवती वाळू गोळा होते. दोन्ही पायांना काही प्रमाणात वाळूचे बंधन निर्माण झाल्यामुळे काहीवेळा तो गोंधळतो, त्याचा तोल जातो आणि तो पाण्यात पडतो.

समुद्राच्या पोटातील हालचालींचे काय?

वेंगुर्ले भागातील मच्छीमारांचे नेते आणि समुद्राचा अनुभव असलेले वसंत तांडेल यांचे असे म्हणणे आहे की, वादळ नसतानासुद्धा समुद्राच्या पोटात अनेक कारणांनी अनेक हालचाली सुरू असतात. त्यासुद्धा मच्छीमार आणि पर्यटकांसाठी धोकादायक असतात. त्याची माहिती मात्र कुणालाच मिळत नाही. शासनाने यावर युद्धपातळीवर प्रयत्न करून तशी माहिती देणारी यंत्रणा निर्माण करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘अंडर करंट’ अन् ‘रिप करंट’ म्हणजे काय?

‘अंडर करंट’ आणि ‘रिप करंट’ यामध्ये काहीसा फरक आहे. ‘अंडर करंट’चा प्रभाव तसा किनार्‍यावर काहीवेळा असतो. परंतु त्याचा सततचा वावर खोलवर समुद्राच्या तळाशी राहतो. जोरात वेगाने वादळी वारे वाहतात तेव्हा समुद्राच्या पाण्यावर वार्‍याचा दाब येतो. त्यातून ‘अंडर करंट’ची निर्मिती होती. लाटा जेव्हा परततात तेव्हा त्यांच्या मार्गात खडक असतात. या खडकातून एक वाट त्या लाटेला सापडते तेव्हा जास्तीत जास्त पाणी या निमुळत्या वाटेने समुद्रात शिरते. तिथेच ‘रिप करंट’ची निर्मिती होते. किनार्‍यावर पाण्यात खेळणारा माणूस या ‘रिप करंट’मध्ये सापडतो तेव्हा तो त्या लाटेसोबत समुद्रात लोटला जातो तो सहजासहजी परत न येण्यासाठी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT