गुहागर शहर : तालुक्यातील झोंबडी काजळवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये गुरुवारी एक कोल्हा पडून सडलेल्या अवस्थेत आढळून आला. सदरचा कोल्हा पाण्यात राहिल्याने सडलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येताच येथील ग्रामपंचायत सरपंच अतुल लांजेकर व सदस्य तसेच ग्रामस्थानी या कोल्ह्याला विहिरीबाहेर काढले.
हा मृत कोल्हा बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे तो सडू लागला असून त्याला जंतूही पडले. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले असून परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे लोकांना ताप, उलट्या, जुलाब, पोटदुखीमुळे लोकांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. झोंबडीचे सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दीपक गायकवाड, आशासेविका साक्षी सरदेसाई यांनी घटनास्थळी जाऊन लोकांची त्वरित काळजीपूर्वक दक्षता घेतली. व वाडीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करून ग्रामपंचायतीमार्फत विहिरीतील पाणीउपसा करून स्वच्छतेचे काम शुक्रवारी सुरू केले होते.
हा प्रकार लक्षात येताच गटविकास अधिकारी शेखर भिलारे व कार्यकारी अभियंत्या दीप्ती धारप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांनी देखील सहाय्यक अभियंता गिरीश पापरकर व पवार यांना घटनास्थळी भेट देण्याची सूचना केली.
दरम्यान, सडलेला मृत कोल्हा विहीरीतुन बाहेर काढून टाकण्यात आला असून विहिरीची स्वच्छता, क्लोरिनेशन/निर्जंतुकीकरण आणि पाण्याची तपासणी करून घेण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कांबळे, आरोग्य केंद्र तळवलीचे अधिकारी वैभव जाधव,मदन जानवळकर यांची भेट घेऊन वाडीतील नागरिकांसाठी 29 रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित आले आहे. सरपंच अतुल लांजेकर स्वतः याबाबत नागरिकांची विचारपूस केली.