रत्नागिरी : बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या रो-रो बोट सेवेची मुंबई-जयगड-विजयदुर्गपर्यंतची चाचणी मंगळवारी पार पडली. 1990 नंतर तब्बल 35 वर्षांनी प्रवासी वाहतुकीची ही बोट जयगडच्या धक्क्याला लागली. यावेळी जयगडवासीयांनी एकच जल्लोष केला. लवकरात लवकर या फेरीच्या रूपाने जलमार्ग सुरू व्हावा, अशी आशाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या काळात प्रवासी रो-रो बोट सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू झाली नाही. मागील काही दिवसात हवामानात झालेले बदल व अन्य गोष्टींचा परिणाम ही सेवा सुरू होण्यास जाणवत होता. मात्र 2 सप्टेंबरचा मुहूर्त चाचणीसाठी निश्चित करण्यात आला. यात यशही आले आहे.
पावसाळी वातावरण, हवामानात झालेला बदल त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ या एमटूएम फेरी बोटीने घेतला. जयगड बंदरात 1 वाजून 55 मिनिटांनी ही बोट दाखल झाली. त्यानंतर अर्ध्या तासाने ही बोट विजयदुर्गच्या दिशेने रवाना झाली. जयगड जेटीवर जयगड ग्रामपंचायतीच्या सरपंच फरजाना डांगे यांच्यासह जिंदलचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी बोटीवरील अधिकार्यांचे स्वागत केले.
1990 नंतर प्रथमच जवळपास 35 वर्षांनी प्रवासी बोट जयगड बंदरात आल्याची आठवण माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांनी सांगितली. रो-रो सेवेचा प्रवास लवकर सुरु व्हावा त्यामुळे जयगडसह रत्नागिरीच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. जयगड येथे वर्ष-दीड वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रवासी जेटी उभारण्यात आली आहे. मंगळवारी जयगड येथे दाखल झालेल्या रो-रो सेवेची बोट सुरक्षित जेटीला लावण्यात यश आले आहे.
याठिकाणी प्रवासी चढू व उतरु शकतात. परंतु फेरी बोटीतून येणार्या कार व अन्य वाहनांना उतरण्याची सध्या स्थिती नाही. यासाठी काही बदल अपेक्षित असल्याचे साळवी यांनी सांगितले. नितेश राणे यांनी ही सेवा सुरु करण्यासाठी घेतलेली मेहनत सर्वच पाहत आहेत, आता ही सेवा यशस्वी करण्याची जबाबदारी कोकणवासियांवर असल्याचे अनिरुध्द साळवी यांनी सांगितले.