चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
वाशिष्ठी नदीत चार ठिकाणी निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे मिरजोळी, शिरळ, कोंढे गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत. या गावांना उन्हाळ्यात मचूळ, खारट, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत आहे. त्यामुळे हे अडथळे तातडीने दूर करा, अशी मागणी मिरजोळी ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे लघू पाटबंधारे विभागाकडे केली आहे. तसे न केल्यास १५ ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याला कोंढे व शिरळ ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
मिरजोळी ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावाच्या पाणी योजनेची जॅकवेल वाशिष्ठी नदीच्या किनारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जॅकवेलमधून ग्रामपंचायत गावाला पाणी पुरवते. असे असताना २०२१ साली आलेल्या महापुरानंतर शासनाने आपल्या विभागाच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
हे काम करीत असताना चिपळूण शहरातील पेठमाप जुनी फरशी भागात नदीचा प्रवाह खेड-लोटे एमआयडीसीच्या जॅकवेलकडे जाणूनबुजून वळवण्यात आला आहे. त्यामुळे त्या बाजूच्या नदीपात्राला कोळकेवाडीतून वीजनिर्मितीनंतर येणारे सर्व पाणी जात असून आमच्या जॅकवेलकडे येणारी नदीची दुसरी बाजू कायम कोरडी दिसून येते.
आपल्या विभागाने चिपळूण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने खेर्डी-माळेवाडी येथे बांधलेला बंधारा यावर्षी आणखी खोल व उंच करून दिला आहे. त्यामुळे पाणी अडण्याचे प्रमाण वाढते आहे. नगर परिषदेने मुरादपूर भागासाठी पेठमाप येथील जुन्या फरशीवरून काही महिन्यांपूर्वी नळपाणी योजनेची पाईपलाईन नेली आहे. तिला संरक्षण म्हणून काही फुटांचे काँक्रिटीकरण केले आहे. यामुळेही पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच आपल्या विभागाने मिरजोळी-जुवाड बेट उक्ताड परिसरात गाळाची वाहतूक करण्यासाठी नदीत रस्ता तयार केला आहे. हे काम संपले असतानाही तो रस्ता तसाच ठेवल्याने नदीचे दोन भाग झाले असून पाण्याच्या प्रवाह दुसऱ्या बाजूला जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मे महिन्यात मिरजोळीसह तीन गावातील ग्रामस्थांना खाडीच्या भरतीचे गढूळ, मचूळ व खारट पाणी पुरवावे लागते. याचा परिणाम लहान मुले, वयोवृद्ध यांच्या आरोग्यावर होत असून विविध आजार आमच्या भागात पसरत आहेत.
त्यामुळे एमआयडीसी, नगर परिषद यांच्या फायद्यासाठी वळवण्यात आलेला वाशिष्ठी नदीचा प्रवाह व पूर्वापार असलेल्या नदीच्या पाण्याच्या प्रवाह थांबवण्यासाठी निर्माण करण्यात आलेले अडथळे दूर झाले नाहीत तर आमच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर होणार आहे. त्यामुळे हे अडथळे तातडीने दूर करावेत; अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तिन्ही गावांतील ग्रामस्थ व ग्रामपंचायती आपल्या कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता यंत्रणा खडबडून जागी झाली असून, ग्रामस्थांना चर्चेला बोलावण्यात आले आहे.
ग्रामस्थांना चांगले पाणी देणे, हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तिन्ही ग्रामपंचायती मिळून आम्ही लढा देत आहोत. काहींच्या फायद्यासाठी जाणूनबुजून वाशिष्ठी नदीत तयार केलेले अडथळे दूर करावेच लागतील; अन्यथा पाण्यासाठी आम्ही मोठा लढा उभारू, असे मिरजोळी ग्रामपंचायतीचे प्रशासक विनोद पवार यांनी सांगितले.