Ratnagiri Zilla Parishad
रत्नागिरी जिल्हा परिषद  
रत्नागिरी

रत्नागिरी : जि.प.चे शिष्यवृत्तीत पाऊल पडते पुढे!

पुढारी वृत्तसेवा
दीपक कुवळेकर

रत्नागिरी : इंग्रजी शाळांच्या तुलनेत कमी भौतिक सुविधा असूनही दिवसेंदिवस मराठी शाळांची गुणवत्ता वाढलेली दिसत आहे. यावर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल 135 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. स्पर्धा परीक्षांमध्येही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी चमकू लागल्याचे दिसून येत आहे.

खासगी शाळांच्या स्पर्धेत जि. प.च्या मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ताही वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यालाही यशही मिळत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांची मुले अव्वल ठरत आहेत. विशेषतः शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. चार वर्षांपूर्वी गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेण्यात आली होती.

शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेतील 135 मुले झळकली आहेत. या परीक्षेत 5 हजार 348 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल 2 हजार 656 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता प्रत्येक वर्षी जि. प.च्या विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमाण वाढत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांनी योग्य नियोजन केले. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षण विभागातर्फे वारंवार चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे त्यांचा या यशात मोठा वाटा आहे.

संगमेश्वर तालुका स्कॉलर

शिष्यवृत्ती परीक्षेतील पाचवीची गुणवत्ता यादी बघितली तर संपूर्ण जिल्ह्यात संगमेश्वर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातील 32 मुले यादीत झळकली आहेत. हा तालुका ग्रामीण भागात मोडत असला तरी विद्यार्थ्यांनी मात्र चांगली हुशारी दाखवली आहे. त्यानंतर राजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.

SCROLL FOR NEXT