चिपळूण : तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथील एका तरुण विवाहितेने अपत्यप्राप्ती होत नाही म्हणून विष प्राशन करून जीवन संपविले. जयश्री विजय मोहिते (वय 27) असे मृत महिलेचे नाव आहे.
25 डिसेंबर रोजी सकाळी 9.45च्या सुमारास डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती विजय भगवान मोहिते यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. 5 मार्च 2017 रोजी विजय आणि जयश्री यांचे लग्न झाले होते. लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी मूल होत नसल्याने त्या मानसिक तणावाखाली असायच्या. त्यातूनच त्यांनी 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वा. उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांना तत्काळ दादर प्रा. आ. केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.