बिवट्याचा हल्ला file photo
रत्नागिरी

Ratnagiri Wildlife Attack | मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला; बिबट्या, वाघांच्या हल्ल्यांनी वर्षभरात 72 लाखांचे नुकसान

Ratnagiri Wildlife Attack | दक्षिण रत्नागिरीत वर्षभरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्याच्या २६७ घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य आणि वनसंपदा ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असली तरी स्थानिक ग्रामस्थांसाठी ती आता चिंतेचा विषय ठरू लागली आहे. रत्नागिरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार प्रमुख तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

२०२५ या वर्षभरातील अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. या एका वर्षात वन्यजीवांनी केलेल्या नुकसानीमुळे शासनाला तब्बल ७२ लाख ४५ हजारांहून अधिक नुकसान भरपाई देण्याची वेळ आली आहे. वन्यप्राणी आणि मानव या वाढत्या संघर्षामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवासी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०२५ या वर्षभरात या चार तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या एकूण ४२६ घटनांची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमध्ये पाळीव प्राण्यांवरील हल्ले, शेतीपिकांची नासाडी आणि दुर्दैवी मनुष्यहानी अशा तीन मुख्य बाबींचा समावेश आहे.

एकूण नुकसानीचा आकडा ७२ लाख ४५ हजार ४ रुपये इतका आहे. यातील सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील पशुपालकांना बसला आहे. बाघ, बिबट्या आणि इतर हिंस्र प्राण्यांनी पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्याच्या २६७ घटना वर्षभरात घडल्या. कोकणातील ग्रामीण अर्थकारण प्रामुख्याने पशुपालनावर अवलंबून असल्याने, या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

या पशुहानीसाठी शासनाकडून ४३ लाख ७० हजार ४५८ रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली. पशुहानीसोबतच शेतीचे नुकसान ही गंभीर समस्या बनली आहे. डुकरे, वानरे आणि माकडांच्या कळपांनी बागायती, शेतीपिकांची मोठी नासाडी केली आहे. वर्षभरात पीक नुकसानीची १५६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत त्यासाठी २२ लाख ९९ हजार ४६७ रुपयांच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेकांनी तर वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी शेती करणे सोडून देण्याचा विचार सुरू केला आहे. या सर्व घटनांमध्ये सर्वात चिंताजनक बाब म्हणजे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेली मनुष्यहानी होय.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

२०२५ मध्ये या भागात मनुष्यावरील हल्ल्याच्या ३ घटनांची नोंद झाली, ज्यासाठी शासनाने ५ लाख ७५ हजार ७९ रुपयांची तरतूद केली आहे. मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आता लोकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वन विभागाने केवळ आर्थिक मदत देऊन न थांबता या वन्यजीवांच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वाढत्या घटनांमुळे वन कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढला असून, प्रशासन या समस्येवर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT