रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
पुढील दोन दिवस कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. वाढत्या आद्रतेमुळे उकाडा वाढणार आहे.
त्यामुळे मुंबईच्या भारतीय हवामान शास्त्र विभाग प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने रत्नागिरी जिल्ह्याला कडक उन्हाचा इशारा आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी तापमान ४१ अंश इतके होते.
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ यावेळेत थेट उन्हात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले.
जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असून घामाने अक्षरशः नागरिक वैतागले आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे तापमान व आद्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.
नागरिकांनी हे करावे
कष्टांची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावीत
तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे
सैल, हलक्या रंगाचे सूती कपडे वापरावेत
भरपूर पाणी पिणे व शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे