गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग, शिस्त आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. गावातील इंचभर जमीनही गावाबाहेर विकू नका, कारण ही आपली जमीनच भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी व्हायला हवा; केवळ मनोरंजन म्हणून त्याचा वापर झाला तर समाजाचा हास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच व पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा गावाच्या विकासाचा मुख्य पाया आहे. योग्य नियोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि प्रामाणिक नेतृत्व या माध्यमातून कोणतेही गाव प्रगत होऊ शकते. कोकणात येणे नेहमीच आनंददायी वाटते. पूर्वी अखंड रत्नागिरी जिल्हा असतानादेखील येथे येण्याचा योग यायचा. निसर्गसंपन्न कोकणामुळे बाहेरील लोकांना येथे यावेसे वाटते. मात्र कोकणातील माणसाला रोजगारासाठी बाहेर जावे लागते. भविष्यात 'चाकरमानी' हा शब्दच पुसून टाकण्याची वेळ येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाढते
तापमान, बेसुमार जंगलतोड व वाढते औद्योगिकीकरण यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिक वाढता वापर ही जगासमोरील गंभीर समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. २६ जानेवारी १९९० रोजी मी हिवरे बाजारचा प्रथम सरपंच झालो तेव्हा ग्रामपंचायतीचे उत्पन्न केवळ ३५० रुपये होते. मात्र लोकसहभाग, श्रमदान आणि शिस्त याच्या बळावर गावात वृक्ष लागवड, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. गावात दारूबंदी लागू करण्यात आली. तसेच शिक्षण व आरोग्यावर विशेष भर देण्यात आला.
गावात सामाजिक शिस्त प्रस्थापित करण्यात आली असून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसावा, हरिपाठ व व्यायाम सक्तीचा असावा, अशा उपक्रमांमुळे सामाजिक वातावरण सकारात्मक झाले. त्यामुळेच हिवरे बाजार हे देशातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले, असे त्यांनी सांगितले.
यानिमित्त परिसरातील आजी-माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक आण्णा सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मठकर व सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर आदी उपस्थित होते.