रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. सध्या जिल्ह्यात 844 टीबीरुग्ण उपचार घेत आहेत. चिपळूण, दापोली, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत, तर मंडणगडात सर्वात कमी रुग्ण आहेत. 1 जुलै ते 23 नोव्हेंबरदरम्यान 25 हजार संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 131 व्यक्तींचा टीबीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील क्षयरोग विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. 60 वर्षावरील व्यक्ती, एकदा टीबी होवून गेलेली व्यक्ती, पुन्हा टीबी झाला यासह विविध आजार, टीबीची सुरूवात अशा संशयितांची तपासणी करून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात, सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. 1 जुलै ते 23 नोव्हेंबर दरम्यान हजारो संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 131 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.महेंद्र गावडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, रत्नागिरी
जिल्ह्यात टीबीमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. या विभागाची सर्व टीम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.त्यासाठी 376 उपकेंद्रांची टीम, 1,401 आशासेविका व विविध कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करीत आहेत. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक संशयित रूग्णांची तपासणी झाली आहे. तसेच क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी 1 हजार रुपये देण्यात येते.