रत्नागिरी : हवामान विभागाने पाच दिवसांचा धोक्याचा इशारा दिला होता. 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न गेलेल्या नौका धोक्याच्या इशाऱ्याची मुदत संपल्यानंतर मासेमारीसाठी गेल्या, परंतु मासळीच मिळत नसल्याने आणि समुद्रात मोठ्या लाटा उसळणे आणि वाऱ्यामुळे मच्छीमार नौका मासेमारी अर्धवट सोडून बंदरात येत आहेत.
हवामान विभागाने 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत धोक्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना सजग केले. धोक्यामुळे अनेक मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या नाहीत. धोक्याच्या इशाऱ्याची मुदत संपल्यानंतर रविवारी सकाळी समुद्रात गेलेल्या नौका पुन्हा संध्याकाळीच बंदरात परत आल्या. वाऱ्यासोबत समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा आणि मासे मिळत नसल्याने नौका मासेमारी अर्धवट सोडूनच परतत असल्याचे मच्छीमार सचिन खेत्री यांनी सांगितले. रोजचा 50 ते 60 हजार रुपये खर्च असताना केवळ चार-पाच टपच मासळी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन हजारपेक्षा अधिक मच्छीमार नौका आहेत. या नौकांनी रविवारपासून मासेमारी करण्यास सुरूवात केली. परंतु श्रीलंकेतील गितवाह वादळ भारताच्या दिशेने येत असल्याने समुद्रात उंच लाटा उसळून जोरदार वारे वाहत असल्यानेच मासळी मिळत नसावी असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला. धोक्याच्या इशाऱ्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यात अनेक वेळा मासेमारी नौका समुद्रात जाऊ शकलेल्या नाहीत. त्यात पुन्हा 25 ते 29 नोव्हेंबरपर्यंतच्या पाच दिवसांची भर पडली. या इशारा कालावधीत बहुसंख्य नौका बंदरातच होत्या.