खेड: गणेशोत्सव केवळ दोन दिवसांवर आला असताना कोकणातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. मुंबई–पुण्यात रोजगारासाठी गेलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकणातील एसटी आगारांतून मोठ्या प्रमाणावर गाड्या हलवल्या जात असल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगारात सध्या ७४ गाड्या असून त्यापैकी तब्बल ४६ गाड्या मुंबई–पुण्याकडे धाडण्यात आल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि कामगार यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांवर विसंबून राहावे लागत आहे.
गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांना परतीसाठी गाडी न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर मुंबईहून उत्सवासाठी गावी आलेल्या काही नागरिकांना भरलेल्या बसमधून अक्षरशः धक्काबुक्की सहन करावी लागली.
“मोफत गाड्या नकोत, पण किमान तालुक्याच्या ठिकाणाहून गावी पोहोचण्यासाठी गाड्या द्या,” अशी मागणी ग्रामस्थ व मुंबईकरांकडून होत आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर ग्रामीण जीवन वाहिनी कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.