रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 92 नर्सिंग होमपैकी तब्बल 28 नर्सिंग होम्समध्ये विविध त्रुटी आढळल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केलेल्या तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. या त्रुटींमध्ये प्रामुख्याने दरपत्रक नसणे, नागरिकांची सनद (सिटीझन्स चार्टर) नसणे, अग्निशमन प्रणालीमधील कमतरता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्यता नसणे अशा कारणांचा समावेश आहे.
ज्या नर्सिंग होम्समध्ये या त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यांना येत्या काळात या त्रुटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. जर या त्रुटी पूर्ण झाल्या नाहीत, तर संबंधित नर्सिंग होम्सना पुढील काळात नूतनीकरण करून दिले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईमध्ये चिपळूण येथील एक नर्सिंग होम हे गेल्या चार वर्षांपासून कोणत्याही वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाने या नर्सिंग होमवर कठोर कारवाई करत मागील चार वर्षांसाठीचा दंड वसूल केला आहे. सध्या या नर्सिंग होमला केवळ तीन महिन्यांसाठी तात्पुरते नूतनीकरण करून देण्यात आले असून, या काळात त्यांना सर्व त्रुटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. जर या अटींची पूर्तता झाली नाही, तर पुढील नूतनीकरण केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांचीही तपासणी करण्यात आली आहे. एकूण 105 सोनोग्राफी केंद्रांपैकी 83 केंद्रे सध्या कार्यरत असून, 23 केंद्रे बंद आहेत. तसेच, दोन केंद्रांवर अनियमितता आढळल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही गर्भलिंग निदान झाल्याची कोणतीही घटना समोर आलेली नाही, असे जिल्हा आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या काही पद्धती अयशस्वी झाल्यामुळे गर्भपात करण्यासाठी अनेक प्रस्ताव दाखल होत असल्याची माहितीही समोर आली आहे.