दापोली ः राज्य परिवहन विभागाच्या ‘शिवाई’ या आधुनिक ई-बसगाड्यांमध्ये अत्याधुनिक डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, दापोली आगारात प्रत्यक्षातील परिस्थिती याच्या पूर्णपणे उलटी असल्याचे दिसून येत आहे. डिजिटल बोर्डावर एका मार्गाचे नाव झळकत असतानाच, चालक-वाहक काचेवर खडूने दुसऱ्याच आगाराचे नाव लिहून बस वेगळ्याच मार्गाने सोडत असल्याचे चित्र प्रवासी वर्गाला बघायला मिळत आहे.
डिजिटल बोर्ड पाहून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची दिशाभूल होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसवलेली ही डिजिटल यंत्रणा योग्य प्रकारे वापरली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही त्याचा अयोग्य वापर करून प्रवाशांना त्रास देणे ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त्ा होत आहे. या प्रकारांवर तातडीने लक्ष देऊन डिजिटल सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी होत आहे.