खेड : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले. या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख यांनी पोलीस व प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कोकणातील रत्नागिरी जिल्हा खेड येथे शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात मोर्चाने धडक दिली. यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे आक्रमक झाले होते.
शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांच्याविरुद्ध अपशब्द वापरत घोषणाबाजीत करणाऱ्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करा. आगामी सात दिवसात सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ व फोटोच्या आधारे संबंधित सर्व व्यक्तींच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, महिला शहर संघटक सौ. माधवी बुटाला, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश खेडेकर, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी निवेदनाची प्रत पोलिस अधिक्षक रत्नागिरी, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड, उपविभागीय अधिकारी खेड डॉ.जस्मिन, तहसिलदार खेड यांना देण्यात आली आहे.
हेही वाचा