रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात आयोजित करण्यात आलेले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वादाच्या भोवर्यात सापडले आहे. प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत विश्वासात न घेतल्याचा गंभीर आरोप करत, तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीने या प्रदर्शनावर बहिष्कार टाकला. त्यामुळे, शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या प्रदर्शनात एकही शिक्षक संघटनेचा नेता फिरकला नाही.
शिक्षण विभागाने प्रदर्शनाच्या नियोजनामध्ये शिक्षक संघटनांना विश्वासात घेतले नाही आणि त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. या एकतर्फी कारभाराच्या निषेधार्थ समन्वय समितीने प्रदर्शनापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एकीकडे स्थानिक तालुका स्तरावरील नेत्यांनी प्रदर्शनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असताना मात्र, दुसर्या बाजूला जिल्हा स्तरावरील नेत्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. नेत्यांच्या या वेगवेगळ्या भूमिकांमुळे शैक्षणिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसार माध्यमांना यापासून दूर ठेवण्यात आले. दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांना निमंत्रण दिले जाते, मात्र यावर्षी शिक्षण विभागाने माध्यमांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. यामुळे, प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्रकल्प जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
तालुका शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियोजनातील त्रुटी आणि संघटना तसेच माध्यमांना बाजूला ठेवल्यामुळे रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शन वादाच्या छायेत आले आहे.
वादग्रस्त अधिकार्याकडे निमंत्रणाची जबाबदारी...
यावर्षी रत्नागिरी पंचायत समितीतर्फे हे तालुकास्तरीय प्रदर्शन आयोजित केले होते. याची जबाबदारी संबंधीत एका अधिकार्याकडे देण्यात आली होती. हा अधिकारी मूळात वादग्रस्त आहे. बोगस कागदपत्रे करून हा अधिकारी सेवेत लागल्याची तक्रार काही वर्षांपूर्वी झाली होती. तसेच हा अधिकारी या प्रकरणामुळे निलंबीतसुद्धा झाला होता.
मात्र या अधिकार्याचा वशीला मोठा असल्याने तो पुन्हा सेवेत रुजू झाला आहे. मात्र त्याची चौकशी सुरू आहे. या अधिकार्याने शिकवणीचा 5 वर्षांच्या अनुभवाचा दाखला असल्याचा खोटा दाखला सादर केला होता. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते.