Sangameshwar Fire Incident Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Fire | नायरी मोहल्ल्यात मध्यरात्री भीषण आग; कौलारू घर जळून खाक

घरातील संसारोपयोगी साहित्यही बेचिराख; सुदैवाने घर बंद असल्याने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

Sangameshwar Fire Incident

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत नियाज पाटणकर आणि जाकीर पाटणकर यांचे कौलारू घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील संसारोपयोगी साहित्यदेखील जळून खाक झाले असून पाटणकर कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, नायरी मोहल्ला येथील पाटणकर यांचे कौलारू घर बंद होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच देवरुख येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला होता. त्यामुळे घरातील साहित्य व घराची वास्तू आगीत जळून पूर्णपणे बेचिराख झाली.

प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फणसवणे मंडल अधिकारी कदम, तलाठी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

या आगीत पाटणकर कुटुंबाचे घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. क्षणात उभ्या संसाराची राखरांगोळी झाली असली, तरी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT