Ratnagiri News| कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

इमारतीची दुरवस्था; ठिकठिकाणी स्‍लॅब कोसळतोय, रुग्णांच्या हिताची महालॅब बंद, ग्रामस्‍थांची होतेय गैरसोय
Ratnagiri News
कडवई : धोकादायक अवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब.
Published on: 
Updated on: 

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पंचक्रोशीतील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, सध्या हे आरोग्य केंद्र विविध समस्यांनी ग्रासले आहे. आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळत असून इमारत धोकादायक बनली आहे. त्यातच रुग्णांच्या विविध तपासण्या मोफत करणारी महालॅब १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या प्रकारामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ कडवई, तुरळ, चिखली, रांगव, शेनवडे, मासरंग आदी गावांतील नागरिकांना होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे दररोज शेकडो रुग्ण या केंद्रात उपचारासाठी येत असतात. येथे मोफत उपचार मिळत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळतो.

शासनाच्या माध्यमातून या आरोग्य केंद्रात रुग्णांच्या विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यासाठी महालॅब सुरू करण्यात आली होती. खासगी प्रयोगशाळांमध्ये हजारो रुपये खर्च करून कराव्या लागणाऱ्या अनेक तपासण्या येथे मोफत होत असल्याने रुग्णांचा पैसा आणि वेळ वाचत होता. मात्र, ही महालॅब अचानक १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने रुग्णांना तपासण्यांसाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून महालॅब पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे, आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्थाही चिंताजनक आहे. इमारतीचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळला असून काही ठिकाणी आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. स्लॅबचे तुकडे वारंवार कोसळत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब त्यावेळी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली होती. सध्याची इमारतीची अवस्था पाहता केवळ दुरुस्ती न करता इमारतीच्या सुरक्षिततेबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

महालॅब बंद झाल्याचे वास्तव आहे. तसेच, इमारतीचा स्लॅब वारंवार कोसळत असून त्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
- संतोष यादव, वैद्यकीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.