Ratnagiri Crime News File Photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime | साडवलीत बॅनरवरून दोन गट आमनेसामने; देवरुख पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी

१६ जणांसह सुमारे ५० ते ५५ अनोळखी व्यक्तींनी येऊन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Ratnagiri Sadavali Banner Clash

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे अभिनंदनाच्या बॅनरवरून दोन गटांत वाद निर्माण झाला असून बुधवारी (दि. ११) सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी देवरुख पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाठा सेनेचे अजित गवाणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नी क्षमा जाधव-गवाणकर या साडवली पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. त्यानिमित्त साडवली येथे अभिनंदनाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर “मोठमोठे गार केले गंमतमधी” असा मजकूर छापण्यात आला होता.

या मजकुरावरून वाद उद्भवल्याचे तक्रारीत नमूद आहे. विजय यशवंत धने उर्फ अभि धने आणि शुभम धने यांनी हातात कोयता व शिग घेऊन संतोष जाधव (साडवली) यांच्या घरी जाऊन बॅनर कोणी लावला याबाबत जाब विचारला. संध्याकाळपर्यंत बॅनर काढला नाही तर ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच दीपक डोंगरे व इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींनीही तेथे येऊन हुज्जत घातल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून अभि धने, शुभम धने, दीपक डोंगरे व इतर अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही विरोधी तक्रार देण्यात आली आहे. विजय यशवंत धने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित बॅनरवरील मजकूर चिथावणीखोर असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी संतोष जाधव यांना बॅनर काढण्यास सांगितले. मात्र तो न काढल्याने त्यांनी बॅनर उतरवून उलटा करून ठेवला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर अजित गवाणकर व त्यांच्यासोबत असलेल्या १६ जणांसह सुमारे ५० ते ५५ अनोळखी व्यक्तींनी येऊन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अजित गवाणकर, नंदादीप बोरुकर, निलेश भुवड, अनुराग कोचीरकर, सागर संसारे, आशुतोष डोंगरे, तेजस भाटकर, दर्शन भाटकर, सचिन शिंदे, मनीष दळवी, सागर चव्हाण, मंगेश शिंदे, रोहित तांबे, तेजस जागुष्टे, मयुरेश भोपळकर, इस्तियाक कापडी यांच्यासह इतर अनोळखी अशा एकूण ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT