अनुज जोशी
खेड : खेड शहराचा पहिला प्रभाग प्रभाग क्र. 1 हा नगरपरिषद हद्दीतील असा भाग आहे की जिथे शहराच्या विकासाचा झगमगाट आणि ग्रामीण जीवनाचा साधेपणा दोन्ही एकत्र नांदताना दिसतात. एकूण 1472 लोकसंख्या असलेल्या या प्रभागात अनुसूचित जातीचे 58, तर अनुसूचित जमातीचे 21 नागरिक वास्तव्य करतात.
या प्रभागाच्या उत्तरेस मौजे भडगांवची हद्द, पूर्वेस प्रभाग क्र. 2 आणि अंतर्गत रस्ता, दक्षिणेस डाकबंगला रस्ता तर पश्चिमेस नारंगी नदी अशी नैसर्गिक व प्रशासकीय सीमारेषा आहे. परिसरात क्षेत्रपाल नगर, शिवाई नगर, खाँडा रस्ता परिसर, एम.आय.बी. हायस्कूल, भैरीभवानी नगराचा काही भाग आणि डाकबंगला परिसराचा काही भाग समाविष्ट आहे. नारंगी नदीचा किनारा, जुन्या वसाहतींचे अवशेष आणि पुरातन लेण्यांचा वारसा यामुळे हा प्रभाग इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या छायेत उभा आहे. मात्र या ऐतिहासिक वारशाची सध्याची अवस्था अत्यंत दुरावलेली आहे. लेणी दुर्लक्षित अवस्थेत असून त्यांचे जतन किंवा पर्यटनविकासाचा कोणताही ठोस प्रयत्न झालेला नाही.
एम.आय.बी. हायस्कूलसारख्या शैक्षणिक संस्थांमुळे या भागात सतत वर्दळ असते. तरीसुद्धा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांनी रस्ते भरलेले असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात त्रास सहन करावा लागतो. शहरातील इतर भागांच्या तुलनेत येथे रस्ते व जलनिस्सारणाची कामे मागे पडलेली आहेत. गटारे सांडपाण्याने तुंबलेली आहेत, पथदीप बंद असल्याने काही भागात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. सुरक्षा आणि स्वच्छतेचा प्रश्न या प्रभागात गंभीर बनला आहे. नगरपालिकेने काही ठिकाणी उद्यान उभारणीचे काम सुरू केले असले तरी ते अद्याप दर्जेदार स्वरूपात पूर्ण झालेले नाही.
शहराचा ‘ग्रामीण स्पर्श’ असलेला हा प्रभाग निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मतदार वर्ग साधा, प्रामाणिक आणि विकासाभिमुख आहे. त्यांची अपेक्षा मोठ्या नाहीत फक्त मूलभूत सुविधा मिळाव्यात, एवढीच मागणी आहे. गटारे स्वच्छ व्हावीत, रस्ते दुरुस्त व्हावेत, पथदीप कार्यरत रहावेत आणि पुरातन वारशाचे संवर्धन व्हावे या काही सोप्या पण महत्त्वाच्या मागण्या मतदारांकडून सातत्याने होत आहेत.आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मध्ये स्थानिक नेतृत्वासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि विकासाला गती देणे. ज्याने नागरिकांच्या या अपेक्षा पूर्ण केल्या, त्याच्याकडे मतदारांचा झुकाव निश्चित होईल, असे स्थानिक राजकीय समीक्षकांचे मत आहे. पुरातन वारसा, नदीचा किनारा, आणि शैक्षणिक वातावरण हे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. पण या वैशिष्ट्यांना अधोरेखित करण्यासाठी आणि परिसराला खऱ्याअर्थाने ‘शहरातील सुसंस्कृत वसाहत’ बनवण्यासाठी पायाभूत सुविधांची नव्याने मांडणी अत्यावश्यक आहे.