Public health awareness Ratnagiri Pudhari
रत्नागिरी

Rajapur News | “माझं गाव आरोग्य संपन्न”: राजापूर तालुक्यात लोकाभिमुख अभियान सुरू

प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित कार्यशाळा उत्साहात पार पडली

पुढारी वृत्तसेवा

Public health awareness Ratnagiri

राजापूर : महाराष्ट्र शासनाने १ एप्रिलपासून राज्यभर “माझं गाव आरोग्य संपन्न” हे लोकाभिमुख अभियान सुरू केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राजापूर तालुक्यात आयोजित कार्यशाळा उत्साहात पार पडली. पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा आणि त्याचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या अभियानाच्या माध्यमातून राजापूर पंचायत समितीने राज्यात उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

कार्यशाळेला पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, राजेश गुरव, प्रसाद मोहरकर, राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राम मेस्त्री तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, आशा गट प्रवर्तक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपसभापती अभिजित गुरव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हे अभियान केवळ स्पर्धा किंवा बक्षीसासाठी नसून नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी आहे. राजापूर पंचायत समितीचा या उपक्रमात राज्यात अग्रक्रम राहावा, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी अभियानाची सविस्तर माहिती देताना स्वच्छता, नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि आरोग्य जनजागृतीच्या उपक्रमांवर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत हे अभियान पोहोचवून ते यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “प्रजा निरोगी, राज्य सशक्त” हे ब्रीदवाक्य साकारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर तसेच पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, प्रसाद मोहरकर आणि राजेश गुरव यांनीही आपल्या गटांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य पर्यवेक्षक वृषाली जाधव यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT