गंगास्थानावरील काशीकुंडात सापडलेला शिलालेख  Pudhari
रत्नागिरी

Rajapur Gangasthan | राजापूरच्या गंगास्थानावरील काशीकुंडात सापडलेल्या शिलालेखाबाबत कुतूहल

शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी तो शिलालेख १६ किंवा १७ व्या शतकातील असल्याचे स्पष्ट केले

पुढारी वृत्तसेवा

Ratnagiri Rajapur Gangasthan Inscription

राजापूर : दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या राजापूर मधील श्रीक्षेत्र गंगा स्थानाबद्दल सदैव प्रत्येकाला मोठी उत्सुकता लागून राहते. एकीकडे सर्वत्र प्रचंड आणि तेवढा सुरु असलेला जीवघेणा उन्हाळा यामुळे पाण्यासाठी जोरदार पायपीट करावी लागत असतानाच दुसरीकडे डोंगराळ भागात काही कुंडात गंगा दर तीन वर्षांनी गंगामाई अवतीर्ण होणे यासारखा असा चमत्कार पहावयास मिळतो. त्यामुळे राजापूरची गंगा कायम चर्चेत रहात आली आहे. आता तर त्या गंगास्थानावरील काशीकुंडात सापडलेला शिलालेख चर्चेचा विषय बनू लागला आहे. दरम्यान इतिहास संशोधक आणि शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी तो शिलालेख १६ किंवा १७ व्या शतकातील असल्याचे स्पष्ट केले.

राजापूर गंगा क्षेत्रावर मुळ गंगेपाठोपाठ काशीकुंड येथील स्नान महत्वाचे मानले जाते. समस्त भाविकांची आजवरची स्नानाची ती एक प्रथा राहिली आहे. काशिकुंडाच्या बाजूलाच एका ठिकाणी भाविक स्नानाची पर्वणी साधतात. तर दुसऱ्या बाजूला पूजा अर्चा होतात. अशा काशिकुंडाच्या एका बाजूला खाली असलेल्या दगडावर तो शिलालेख कोरण्यात आलेला आहे. त्यावर "चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर" अशी अक्षरे त्यावर कोरलेली असून या शिलालेखावर काळाचा उल्लेख नसल्याने याचा कालावधी समजून येत नाही.

मात्र अक्षरांचे वळणदारपण पाहता हा शिलालेख १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असावा, असे वाटते . ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दोनदा गंगास्नान केल्याचे उल्लेख काही बखरींमध्ये सापडतात. तसेच १६६४ मध्ये त्यांच्या विनंतीवरून गागाभट्टांनी येथे विद्वानांची सभा भरवल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. काशी कुंडात ज्या ठिकाणी गंगापुत्र कळशीने पाणी घेतात. म्हणजेच कळशी बुडवितात त्या ठिकाणी एका दगडावर हा शिलालेख आहे. या शिलालेखाची अक्षरे वळणदार असून अद्यापही स्पष्ट आहेत.

राजापूरच्या गंगेचा उल्लेख मेदिनी पुराणातही मिळतो . सातवाहन राजाने या गंगास्थानाचा जीर्णोध्दार करताना येथील कुंडे बांधली असल्याचे मानले जाते. तर शालिवाहन राजा सोमेश्वर याने ही या गंगास्थावर आपल्या काळात (इ.स. १२५५-१२६५) वस्ती केल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात . याबाबत इतिहास संशोधक आणि शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी त्या शिलालेख बद्दल आपले मत अभ्यासपूर्ण मांडले आहे. शिलालेख वरील मजकूर.. त्याची मांडणी.. अक्षरे लक्षात घेता तो १६ किंवा १७ व्या शतकातील असावा असा कयास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी शिलालेखचे वाचन देखील केले आहे.

त्यानुसार शिलालेखाचा अर्थ - चरण रज — पवित्र पादधूळ (गुरू/देवाच्या चरणांची रज) भास्कर — सूर्य; तसेच व्यक्तिनाम (भास्कर) काशी — वाराणसी (प्राचीन काशी नगरी) जोशी — ज्योतिषी/ब्राह्मण आडनाव सोमेश्वरकर — सोमेश्वर क्षेत्राशी संबंधित; शक्यतो सोमेश्वर मंदिर परिसराशी निगडित आडनाव/उपाधी “(श्रीच्या) चरणरज (मानीत असलेले) भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर” म्हणजे काशी-निवासी जोशी वंशातील भास्कर, जे सोमेश्वरकर म्हणून ओळखले जातात, (ते) चरणरज समान पवित्र…असा त्या शिलालेखचा अर्थ होतो.

अनिल दुधाने यांनी अनेक शिलालेख तपासून आपल्या अभ्यास पूर्णतेने त्याची यशस्वी उकल केली आहे. या शिलालेख संशोधनात राजापूर येथील पत्रकार व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांचे सहकार्य लागल्याचे दुधाने यांनी स्पष्ट केले आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT