राजापूर : तालुक्यातील पाचल येथील एका गॅस सेवा केंद्रामध्ये भरारी पथकाने छापा टाकून अनधिकृतपणे साठवून ठेवलेला एक व्यावसायिक सिलिंडर आणि तब्बल १,०९४ ग्राहक कार्ड जप्त केली आहेत. याप्रकरणी पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून पाचल येथील श्री सद्गुरू गॅस सेवेचे चालक विलास भिकू कोलते (वय ५५, रा. रायपाटण) यांच्यावर राजापूर पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरचे तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक नीलेश लाड आणि लिपिक विक्रम पाटील हे काही दिवसांपूर्वी पाचल परिसरात तपासणीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी पाचल येथील विलास कोलते यांच्या 'श्री सद्गुरू गॅस सेवा' या एचपी गॅस एजन्सीच्या दुकानाची झडती घेतली.
या तपासणीदरम्यान पथकाला दुकानामध्ये एका कंपनीचा एक रिकामा व्यावसायिक सिलिंडर आणि विविध ग्राहकांची १,०९४ गॅस कार्ड मिळून आली. याबाबत कोलते यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. दरम्यान, तपासणीसाठी गेलेल्या पथकाने ते सर्व साहित्य ताब्यात घेतले होते.