रत्नागिरी

Rajapur waterfalls : राजापूर तालुक्‍यातील निसर्गरम्य धबधबे पर्यटकांना खुणावताहेत!

धबधब्यांचा तालुका म्हणून राजापूरची ओळख होऊ लागली आहे

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : श्रावण महिन्याला आरंभ झाला असून, पावसाळी पर्यटनसाठे खास प्रसिद्ध असलेले तालुक्‍यातील ठिकठिकाणचे धबधबे जोमाने वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत. राजापूर तालुक्यात चार-पाच ठिकाणी निसर्गरम्य धबधबे आहेत.

निसर्गाने राजापूर तालुक्याला भरभरून सौंदर्य दिले आहे. पावसाळी दिवसांत विविध धबधब्यांच्या रूपात त्याचे दर्शन होत असते. तालुक्यात धोपेश्वर, सौंदळ, हार्डी, चुनाकोळवण व काजिर्डा याठिकाणी निसर्गरम्य धबधबे असून जोरदार पावसामुळे सर्व धबधबे जोमाने वाहू लागले आहेत.

प्रमुख धबधबे आणि त्यांची वैशिष्ट्ये:

१. धोपेश्वर धबधबा

तालुक्यातील शंकराचे जागृत स्थान असलेल्या धोपेश्वर मंदिरजवलून वाहणाऱ्या मुळुनी नदीचा मोठा प्रवाह खाली नदीपात्रात पडतो. ते दृश्य नयनरम्य असते. श्रावणात दर सोमवारी मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक या धबधब्याखाली मनमुराद स्नानाचा लाभ घेतात. निसर्गसंपन्न परिसरामुळे या धबधब्याला पर्यटनासह आध्यात्मिक ट्च राहिला आहे.

धोपेश्वर धबधबा

२. हार्डी, चुनाकोळवण धबधबे

शहरापासून काही कि.मी.वर हार्डी येथील धबधबादेखील निसर्गरम्य परिसरात आहे. तिथे सुद्धा हौशी पर्यटक स्नानासाठी जात असतात. चुनाकोळवण येथील सवतकडा हा धबधबा तर खूपच आकर्षक आहे. तो अत्यंत अवघड अशा ठिकाणी ऊन्हावरून जरी दर्शन होत असले तरी खाली उतरून जावे लागते. शासनातर्फे या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. येथे अगदी पश्चिम महाराष्ट्राज जिल्ह्याच्या विविध ठिकाणांवरून पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

चुनाकोळवण धबधबे

सौंदळचा धबधबा

तालुक्याच्या मध्य-पूर्व परिसरात सौंदळ येथे बोरेवाडीतील धबधब्याचे दूरवर असलेल्या ओणी-अणसुरकुवा मार्गावरून दर्शन होते. सौंदळमधून त्या धबधब्याकडे पायवाटेने जाताना जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लागतात. उंचावरून खाली कोसळणारा पाण्याचा प्रपात आजूबाजूच्या शांततेचा भंग करतो. झाडोझुडपांमधून सौंदळ धबधब्याचे दर्शन होते. येथे पर्यटक कमी प्रमाणात येतात.

सौंदळचा धबधबा

काजिर्डा गावातील धबधबा

तालुक्याच्या जामदाखोरे परिसरातील काजिर्डा गावातील धबधबा हा सर्वात मोठा आहे. काजिर्डा गावात प्रवेश केला की लांबून त्याचे दर्शन होते. बाजूलाचू डोंगरासह हिरवीगार वनराई अशा निसर्गाला लाभलेल्या नजाकतेमध्ये एका बाजूला एखादे पादरेखृस वस्त्र शोभावे असे काजिर्डामधील धबधब्याचे दर्शन होते. विशेष म्हणजे हा धबधबा मार्ग, एप्रिलपर्यंत प्रवाहित असतो. अगदी मे महिन्यातदेखील त्याचा क्षीण झालेला प्रवाह पहाण्यास मिलतो. मात्र, या धबधब्याकडे जाताना खूप पायपीट करावी लागते.

काजिर्डा धबधबा

या प्रमुख धबधब्यांसह तालुक्यात अन्यठिकाणीदेखील छोटे-मोठे धबधबे पाहावयास मिळतात. राजापूर तालुका व कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये पावसाळी दिवसांत अनेक धबधबे पाहावयास मिळतात. धबधब्यांचा तालुका म्हणून राजापूरची ओळख होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT