

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथील नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गोळप परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आर्यन संतोष पालकर (१२, रा. गोळप पंचशील, रत्नागिरी) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आर्यन हा सहावीत शिकत होता. गुरुवारी शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता तो मित्र सार्थक पालकर याच्यासोबत घराजवळील नदीवर पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन पाण्यात बुडू लागला. त्याने आरडाओरडा करताच त्याचा आवाज ऐकून आजुबाजूच्या नागरिकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. काही नागरिकांनी नदीत उड्या घेतल्या. सायंकाळी ६.३० वाजता आर्यनला नदीतून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रात्री ९.२० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनला तपासून मृत घोषित केले. आर्यनच्या मृत्यूमुळे पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गोळप परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.