रत्नागिरी नगर परिषदेत उपनगराध्यक्ष व गटनेते निवडीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत
शिवसेना-भाजप युतीतील पदवाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही
ठाकरे गटाकडूनही गटनेता निवडण्यात विलंब
पालकमंत्री उदय सामंतांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष
रत्नागिरी : भालचंद्र नाचणकर
रत्नागिरी नगर परिषदेतील शिवसेना, भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या गटनेत्यांची निवड आणि स्विकृत नगरसेवकांसह उपनगराध्यक्ष निवड करण्यासाठी केवळ पंधरा दिवस राहिले आहेत.
परंतु सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीसह शिवसेना ठाकरे पक्षाकडून या निश्चितीसाठी अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही. पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत आपल्या रत्नागिरी दौऱ्यात निर्णय घेणार आहेत. रत्नागिरी नगर परिषदेतील नगराध्यक्षांसह ३२ नगरसेवकांच्या नावाचे शासकीय राजपत्र २२ डिसेंबर रोजी जाहीर झाले.
या राजपत्रानुसार पुढील २५ दिवसात उपनगराध्यक्षांसह स्विकृत नगरसेवक (नामनिर्देशीत सदस्य) आणि गटनेत्यांची निवड होणे बंधनकारक आहे. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. सर्वप्रथम प्रत्येक राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांचा गटनेता निवडून जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घ्यायची आहे.
उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागते. रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवकांच्या तौलीक बलाबलाने शिवसेनेचे दोन, तर भाजपाचा एक स्विकृत नगरसेवक होवू शकणार आहे. दहा नगरसेवकांमधून एक स्विकृत नगरसेवक निवडला जातो.
शिवसेना-भाजप युती असल्याने शिवसेनेचे दोन तर भाजपचा एक स्विकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. त्याचवेळी युतीतील कोणत्या पक्षाला उपनगराध्यक्षपद आणि समित्या मिळणार याची अद्याप निश्चिती झालेली नाही. या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक निवडीसाठी नूतन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांना विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागणार आहे. ही सभा बोलावण्यासाठी तीन ते सात दिवसांपूर्वी अजेंडा किंवा विषय पत्रिका काढावी लागणार आहे.
परंतु यासंदर्भात आवश्यक असणारी युतीतील बोलणी अद्याप मार्गी लागलेली नाहीत. एकीकडे शिवसेना-भाजप महायुतीची पक्षीय पातळीवर अद्याप कोणतेच नियोजन झालेले नसले तरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बाबतीतही अशीच अवस्था आहे. या पक्षाकडे तीन नगरसेवक असून त्यांचाही गटनेता अद्याप निश्चित झालेला नाही.