Ratnagiri Mental Hospital Diet Issue Resolved 
रत्नागिरी

Ratnagiri Mental Hospital Diet Issue Resolved |मनोरुग्णालयातील रुग्णांच्या आहाराचा प्रश्न सुटला

तीन वर्षांसाठी १.८० कोटींच्या निधीला मंजुरी; संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता पुढील तीन वर्षे दर्जेदार आणि पौष्टिक आहार नियमितपणे मिळणार आहे. मनोरुग्णालयातील रुग्णांच्या अन्नधान्य, किराणा, भाजीपाला आणि इतर नित्योपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तब्बल १ कोटी ८० लाख २८ हजार ६६६ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे रुग्णाल-यातील आहार सेवा अधिक दर्जेदार आणि सुरळीत होण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना दररोज भोजन आणि इतर आवश्यक आहार सेवा पुरवली जाते. यापूर्वी देण्यात आलेल्या तीन वर्षांच्या कराराची मुदत संपल्यामुळे नवीन खरेदीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळणे अत्यंत आवश्यक होते. रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना वेळेवर अन्नधान्य उपलब्ध व्हावे, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने सन २०२६-२७ ते २०२८-२२ या तीन आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी हा निधी मंजूर केला आहे.

या योजनेच्या पहिल्या वर्षासाठी ५४ लाख ४६ हजार ७२७ रुपये मंजूर करण्यात आले असून, पुढील प्रत्येक वर्षासाठी महागाईची १० टक्के वाढ गृहीत धरून दुसऱ्या वर्षासाठी ५९ लाख ९१ हजार ३९९ रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी ६५ लाख ९० हजार ५३९ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून रुग्णांसाठी साखर, चहापत्ती, गोडतेल, विविध डाळी, तांदूळ, गव्हाचे पीठ यांसारख्या किराणा मालासह ताजी प्रथिनांनी समृद्ध अंडी, दूध आणि केळी-मोसंबी सारखी फळे खरेदी केली जाणार आहेत.

शासकीय नियमांनुसार ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ई-निविदा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी खरेदीपूर्वी आणि पुरवठ्यानंतर वस्तूंची कडक नमुना तपासणी केली जाईल. तसेच, अन्नाचा कोणताही अपव्यय होणार नाही आणि अन्नधान्य विहित मुदतीत वापरले जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सरकारच्या या संवेदनशील निर्णयामुळे रत्नागिरी मनोरुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची आणि आहाराची चिंता मिटली असून, स्थानिक स्तरावर समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT