Mumbai Engineer Drowns
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथे घडली. अथर्व राजेश देसाई हा युवक पोहता येत नसतानाही खाडीच्या पाण्यात उतरला. पाण्याच्या प्रवाहामुळे तो बुडाला. ग्रामस्थ, नातेवाईक आणि पोलिसांनी रात्रभर शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. या पथकाने तब्बल २३ तासांनी मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह शोधून काढला. या घटनेमुळे मेढे-मांजरे गावावर शोककळा पसरली आहे.
मुंबईत वास्तव्यास असलेला अथर्व आपल्या पालकांसह मेढे-मांजरे कळकदेकोंड येथे गणेशोत्सवासाठी गावी आला होता. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई आणि वेदांत मनीष देसाई या मित्रांसह जांभळी बंदर येथे पोहण्यासाठी गेला होता. याबाबत त्यांनी घरातील कोणालाही कल्पना दिली नव्हती.
जांभळी बंदर येथे पोहोचले तेव्हा ओहोटी सुरू होती आणि खाडीच्या पाण्याला जोरदार प्रवाह होता. अथर्वला पोहता येत नव्हते. त्याचे मित्रही पोहण्यात फारसे तरबेज नव्हते. मात्र, अथर्वने पाण्यात उडी मारली आणि काही वेळातच तो बुडू लागला. त्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी तातडीने वाडीत धाव घेत ग्रामस्थांना माहिती दिली.
यानंतर अथर्वचे पालक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी खाडीत उतरून त्याचा शोध सुरू केला. मात्र, पाण्याला असलेल्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.
घटनेची माहिती डिंगणी पोलीस दूरक्षेत्राला देण्यात आली. त्यानंतर संगमेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर आणि होमगार्ड यांच्यासह ग्रामस्थांनी होड्यांच्या सहाय्याने रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, अथर्वचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने एनडीआरएफच्या पथकाशी संपर्क साधला. मंगळवारी दुपारनंतर एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम हाती घेतली. दोन पथकांच्या माध्यमातून खाडी परिसरात शोध घेण्यात आला. अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह पथकाच्या हाती लागला.
अथर्वने याच वर्षी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. अभ्यासासोबतच तो खेळातही अग्रेसर होता. त्याच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातही हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अचानक होणारा पाऊस, नदीच्या पाण्यातील वाढ, खाडीतील भरती-ओहोटीमुळे होणारे पाण्याचे चढ-उतार तसेच नदीतील खड्डे व प्रवाह यांची माहिती नसल्यास मुंबईसह परजिल्ह्यांतून गावी आलेल्या नागरिकांनी पाण्यात उतरून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.